संतोष वळसे पाटील
मंचर: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून खासगी एजंटांचा सुळसुळाट झालेला पहायला मिळत आहे. फक्त एक रुपयात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होत असताना खासगी एजंट याच नोंदणीसाठी कामगारांकडून 1 हजार ते 1 हजार 100 रुपये उकळत आहेत. (Latest Pune News)
पुणे जिल्ह्यातून व विशेषतः जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातून ही बाब समोर आली असली तरी संपूर्ण राज्यातच अशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता कामगारांमधूनच जोर धरू लागली आहे.
बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सुरू आहे. कामगार कल्याणकारी मंडळाकडून अटी व शर्तींना अधीन राहून नोंदणी झालेल्या कामगारांना कामाच्या ठिकाणी वापरायच्या साहित्यासह घरात वापरायच्या गृहोपयोगी साहित्याचे म्हणजेच भांड्यांचे मोफत वाटप करण्यात येते.
त्याचबरोबर कामगारांना अपघात सहाय्य, आजारपणात वैद्यकीय सहाय्य करण्यात येत असून बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेणार्या मुलांना शिक्षण सहाय्य म्हणून शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. मात्र आता या योजनेत अपहार सुरू असल्याने याच्या चौकशीची गरज निर्माण झाली आहे.
नक्की कशा पद्धतीने सुरू आहे भ्रष्टाचार
बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया असून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. नोंदणीसाठी एक रुपया इतके माफक शुल्क असल्याचेही संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. मात्र, एजंट 1 ते 1 हजार 100 रुपये नोंदणीसाठी घेत आहेत.
अधिकार्यांकडून ठराविक शासकीय उत्तर
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्याधिकारी विवेक कुंभार व पुण्याचे कामगार उपयुक्त अभय गीते यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता असं काही सुरू असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचं दोघांनीही सांगितले. अशा पद्धतीने कामगार नोंदणीसाठी किंवा कामगारांना लाभ मिळवून देण्याच्या नोंदणीसाठी पैसे घेता येत नाहीत व कॅम्प, मेळावे देखील घेता येत नाहीत. आम्ही त्याला परवानगी देत नाही. या भ्रष्टाचार प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, असे ठराविक शासकीय उत्तर या दोन्ही अधिकार्यांनी दिलंय.
मंडळाकडून मोफत भांडी मिळवून देण्यासाठीही एजंट 1 हजार ते 1 हजार 500 रुपये मागत असून बांधकाम कामगारांना मिळणार्या शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या निम्म्या रकमेवर हे खासगी एजंट डल्ला मारत आहेत. बांधकाम कामगार नोंदणीत होत असलेल्या या अनागोंदीकडे संबंधित विभागाचे अधिकारी मात्र डोळेझाक करत आहेत.- नितीन भालेराव, आंबेगाव तालुका संघटक, शिवसेना (उबाठा)
बांधकाम कामगार नोंदणीत खासगी एजंटांचा नोंदणीच्या नावाखाली सुळसुळाट सुरू आहे. कामगारांची मोठी आर्थिक लूट ते करीत आहेत. एक रुपया नोंदणी फी असताना कामगारांकडून 1 हजार ते 1 हजार 100 रुपये आकारले जात आहेत. एवढी लूट होऊन कोणीही बोलायला तयार नाही, हे प्रशासकीय दुर्लक्ष आहे.- अल्लूभाई इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस आय