

राजेंद्र खोमणे
नानगाव: आगामी काही महिन्यांत दौंड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची रंगीत तालीम सध्या सुरू आहे. सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या लोकांची विविध कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यामुळे इच्छुकांची चढाओढ पहावयास मिळत आहे आणि उपस्थितांना चर्चेसाठी विषय मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
गाव आणि परिसरात वर्षभर वेगवेगळे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक कार्यक्रम होत असतात. यामध्ये लग्नसमारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ, शिबिरे, अंत्यविधी, पुण्यस्मरण आणि युवकांचे एकत्र वाढदिवस अशा विविध कारणांनी इच्छुकांची कार्यक्रमांमध्ये हजेरी वाढत आहे. त्यामुळे कार्यक्रमांना भेट देण्यासाठी इच्छुकांची धावपळ दिसून येत आहे. (Latest Pune News)
मे, जून आणि पुढील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ होतात. एका दिवसात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम असतात. अशा कार्यक्रमांना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामुळे इच्छुक त्यांना भेट देण्यासाठी आटापिटा करताना दिसून येत आहेत.
यामध्ये कोण कधी पोहचतो, किती वेळ थांबतो, आणि कार्यक्रमात किती सहभाग घेतो याकडे उपस्थितांचे लक्ष असते. कधी कुणाच्या सुख- दुःखात आणि आनंदात सहभागी नसणारे देखील सध्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवून काय कमी जास्त आहे का ? अशी विचारपूस देखील करताना दिसून येत आहेत.
तसेच कधीतरी गावात दिसणारे आता बर्याचदा गावात येत नागरिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रोज गावात असणार्या आपल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेताना दिसून येत आहेत.
कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी इच्छुकांना भट्टीचे कपडे, चारचाकी वाहन आणि कार्यकर्ते या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सध्या ऊन आणि पावसाचे दिवस असल्याने भट्टीच्या कपड्यांचा खर्च वाढलेला आहे. याशिवाय कार्यक्रमासाठी दूरवर जावे लागते, त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा खर्चदेखील वाढतो. कार्यकर्त्यांचा देखील खर्च येतो.
गावातील कट्ट्यांवर चर्चांना ऊत
गावात काही जण जे घराच्या समोरुन जायचे पण कधीही विचारपूस करत नव्हते, ते आता घराचे उंबरे झिजवत आहेत. वेळोवेळी घरी येत विचारपूस करत आहेत. तसेच गावोगावच्या चावड्या व कट्ट्यांवर चर्चा रंगताना दिसत आहेत.
जेवणावळी आणि मदत
निवडणुकीच्या काळात मटण, दारू आणि पैशांचा मोठा वापर होतो. परंतु काही इच्छुकांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. महत्वाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलावून जेवणावळी आणि गरजूंना आर्थिक मदत देत आहेत. त्यातून निवडणुकीत आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.