पुणे: वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्यांनी अक्षरशः नदी-नाल्यांचे रूप धारण केले असताना पूरनियंत्रणाची कामे मात्र कागदावरच राहिल्याचा आरोप करत स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक सुहास टिंगरे यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
नागरिक आणि वारकऱ्यांना सुरक्षितपणे रस्ते ओलांडता येत नसतील, तर प्रशासनाने किमान तत्काळ बोटींची व्यवस्था तरी करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत लगावला.
वडगाव शेरी परिसरात पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए)अंतर्गत विविध विकासकामांचा गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून स्थायी समिती तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा सातत्याने मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बहुतांश कामे अद्याप रखडलेली असल्याचा आरोप टिंगरे यांनी केला.
जून २०२४ मध्ये पूरप्रवण भागांतील विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, वर्षभर उलटूनही अनेक ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही. ज्या ठिकाणी कामे सुरू झाली होती, तीदेखील गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याचे टिंगरे यांनी निदर्शनास आणून दिले.
सततच्या पावसामुळे मतदारसंघातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनेक रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचवेळी आषाढी वारीनिमित्त मोठ्या संख्येने वारकऱ्यांच्या दिंड्या वडगाव शेरी परिसरात मुक्कामी आल्या आहेत.
अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करत टिंगरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रखडलेली पूरनियंत्रणाची सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवावा आणि पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.