दिवे: पुरंदर तालुक्यातील शेतकरी फळबागेबरोबरच कांदा, तरकारी भाजीपाल्याचे दर्जेदार उत्पादन घेत असतात. मेथी, कोथिंबीर, शेपू, कांदापात या भाजीपाल्याचे पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.
मात्र, सध्या कोथिंबिरीचे बाजारभाव कमालीचे घसरले आहेत. जुडीला अवघा 3 रुपये बाजारभाव मिळत असून, यामध्ये शेतकर्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. परिणामी, कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Latest Pune News)
मधल्या काळात कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळत होता. मात्र, सध्या बाजारात कोथिंबिरीची मोठी आवक होत असल्याने बाजारभाव गडगडले आहेत. कडक उन्हामुळे कसेबसे उत्पादन घेतले. अशातच सततच्या पावसामुळे कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. शिवाय बाजारभाव नसल्याने चार पैसे मिळवून देणारे पीक हातचे गेले आहे.
कोडीत येथील शेतकरी अमोल बडदे यांनी 20 गुंठे क्षेत्रावर मे महिन्यात कोथिंबिरीची लागवड केली होती. त्याची सध्या काढणी सुरू आहे. मंगळवारी बडदे यांनी ढुमेवाडी (दिवे) येथील बाजारात दोन हजार जुडी विक्रीसाठी आणली होती. त्यातील फक्त थोडीफार कोथिंबीर विकली गेली, ती देखील अवघ्या तीन रुपये या भावाने. यामध्ये बडदे यांची मजुरी व वाहतूक खर्च देखील निघाला नाही.