पुणे: शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचार्याने ओळखीचा गैरफायदा घेत महिलेसह तिचा पती आणि मुलाकडून 73 तोळे सोन्याचे दागिने, 17 लाख 64 हजार रुपयांची रोकड उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नी, आई आजारी असून, त्यांचे वैद्यकीय बिल भरण्यासाठी तर कधी मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क भरण्याच्या बतावणीने हा ऐवज घेऊन फसवणूक केली आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश अशोक जगताप (रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड) असे त्याचे नाव आहे. याबाबत कोथरूडमधील 51 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारी 2019 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान हा प्रकार घडला. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि जगताप हे अनेक वर्षांपासून परिचित आहेत. या ओळखीचा फायदा घेत जगताप यांनी महिलेला वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक मदतीची विनंती केली. बायकोचे ऑपरेशन करायचे आहे, तसेच मुलीच्या शिक्षणाची फी भरायची आहे, अशी कारणे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून 73 तोळे दागिने घेतले.
तिच्या मुलाला पर्सनल लोन काढायला सांगून तसेच महिलेच्या पतीचा विश्वास संपादित करून त्यांच्याकडून एकूण 17 लाख 64 हजार रुपये उकळले. 2019 ते 2022 या काळात जगतापने ही रक्कम व दागिने घेतले.
पैसे परत करतो, असे आश्वासन देत वेळ काढण्यात आला. मात्र, काहीच परत न दिल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चतुःश्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहेत.
क्राईम ब्रँचमध्ये पीएसआय असल्याची बतावणी
जगताप हे पोलिस कर्मचारी आहेत. मात्र, त्यांनी संबंधित महिलेला आपण पोलिस दलात पीएसआय असल्याचे सांगितले. पत्नी, आई आणि मुलीच्या शिक्षण अशी विविध
बनावट कारणे सांगून त्यांनी विश्वास संपादित केला. दरम्यान, यापूर्वी जगतापने औंधमधील एका सराफाचीहीफसवणूक केली होती. या घटनेनंतर जगताप याला सेवेतून निलंबित केले होते.
महिलेने याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरूड परिसरात घडल्यामुळे पुढील तपासासाठी हा गुन्हा कोथरूड पोलिसांकडे वर्ग केला आहे.- उल्हास कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतुःश्रृंगी पोलिस ठाणे