पुणे

राज्यातील सर्व विद्यापीठांचे पदवीप्रदान हवे एकाच दिवशी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'राज्यातील विद्यापीठांनी पदवीप्रदान समारंभासाठी एक दिवस निश्चित करावा आणि एकाच दिवशी राज्यातील सर्व विद्यापीठांत हा समारंभ व्हावा,' अशी अपेक्षा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 120 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, 'केंद्राने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केल्यानंतर देशातील पहिली प्राध्यापक प्रबोधिनी पुणे येथे स्थापन झाली. इन्फोसिससारख्या संस्थेशी याबाबत करार करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यापीठाचा सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यापीठ आणि शासनाने प्रयत्न केल्यास राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अनुकूल बदल घडवून आणता येतील.'

डॉ. पटवर्धन म्हणाले, 'विद्यापीठांचे सक्षमीकरण करून आपल्या गरजेवर आधारित शिक्षण पद्धती विकसित करावी लागेल.' एकूण 1 लाख 18 हजार 222 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. नितीन करमळकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात पाच वर्षांचा आढावा घेतला.

SCROLL FOR NEXT