लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यात जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निधीत दुजाभाव झाल्याने तसेच राजकीय नेत्यांच्या मुलांना शासकीय कामाचे ठेके दिल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचार नियोजनाच्या दौ-यात नेत्यांवर नाराजीचा रोष उमटला. याउलट निवडणुकीचे नियोजन या बेभरोशी नेत्यांवर सोपवल्याने सध्या महायुतीतील दौर्यात नेत्यांचा भरणा दिसत असून कार्यकर्त्यांची वानवा जाणवत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव आणि शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात लढत आहे. दोन्ही उमेदवारांच्या तालुक्यातील नेत्यांनी प्रचाराच्या नियोजनासाठी गावोगावी दौरे सुरू केले आहेत. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी दिले आहेत. हवेली तालुक्यात विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवार गटाचे असल्याने त्यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर तालुक्यात विकास निधी टाकण्याची जबाबदारी दिली. त्यांनी स्थानिक गावकारभार्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने स्वत:च्या मर्जीने निधीचे वाटप केले.
मोठ्या गावांना अल्प प्रमाणात तर छोट्या गावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन जाणीवपूर्वक भेदभाव केल्याने आधीच नाराज असलेल्या गावनेत्यांनी या प्रचाराच्या नियोजनाच्या दौर्यात नेत्यांना चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा हवेली तालुक्यात जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे या सर्व विकासकामांची ठेकेदारी अजित पवार समर्थकाच्या मुलाने व तालुक्यातील राजकीय नेत्याच्या जवळ असलेल्या ठेकेदाराला दिल्याने संतापलेल्या नागरिकांचा रोष सध्या व्यक्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे, त्यामुळे या नेत्यांची नागरिकांची समजूत काढताना दमछाक होत आहे.
विशेष म्हणजे ठेकेदारी मिळवलेल्या या नेत्यावर तालुक्यातील उमेदवाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी दिली असताना हा नेता ज्या गावात बैठक असेल त्या गावातील कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणावळीचा खर्च करायला लावत असल्याने अनेक कार्यकर्ते या बैठकीपासून पाठ फिरवत आहेत. तर ठेकेदारीतून गब्बर झालेला नेता खर्च करण्यास टाळाटाळ करत आहे. सध्यातरी या बैठकींना नेते मंडळीचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसत आहे; तर कार्यकर्ते गायब असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
हेही वाचा