पुणे

‘क्यूआर कोड’ने होणार जप्त साहित्य सीलबंद

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य आता 'क्यूआर कोड'ने सीलबंद केले जाणार आहे. तसेच, कारवाईचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पदपथावर अतिक्रमण करणारे खाद्यपदार्थ विक्रेते इतर साहित्य विक्रेते, विनापरवाना हातगाडी, स्टॉल आदींवर कारवाई केली जाते. ही कारवाई करताना अतिक्रमण विभागाच्या वतीने संबंधित पथारी व्यावसायिक, स्टॉलधारक यांच्याकडील साहित्य जप्त करून अतिक्रमण विभागाच्या गोदामांमध्ये ठेवण्यात येते.

संबंधित विक्रेत्याकडून दंड वसूल झाल्यानंतर त्याला ते साहित्य परत केले जाते. मात्र, अनेकवेळा व्यावसायिकांकडून आमचे साहित्य जास्त जप्त केले. मात्र, देताना कमी दिले, असे आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर जप्त केलेले साहित्य क्यूआर कोडच्या साहाय्याने सीलबंद केले जाणार आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच, जप्तीची कारवाई करताना व्हिडीओ शूटिंगदेखील केले जाते.

लिलाव प्रक्रिया सुरू करणार

अतिक्रमण विभागाकडे तेरा गोदामे असून, ही सर्व गोदामे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या साहित्याचा आता लिलाव केला जाणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे उपायुक्त जगताप यांनी नमूद केले.

कारवाईमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जप्त केलेले साहित्य हे क्यूआर कोडने नोंदविले जाईल, तसेच जे छोटे साहित्य आहे, हे एका पोत्यामध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवून त्यावर क्यूआर कोडची नोंद केली जाईल आणि बॉक्स किंवा पोते हे सीलबंद केले जाईल. संबंधित विक्रेत्याला हा क्यूआर कोड देण्यात येईल. त्याने दंड भरल्यानंतर या क्यूआर कोडच्या आधारे त्याला त्याचे जप्त केलेले साहित्य परत मिळेल.

– माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT