पुणे

जलजीवन मिशन पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करा : आ. सुनील शेळके

Laxman Dhenge

वडगाव मावळ : माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मावळ तालुक्यात 114 पाणी योजनांची कामे सुरू आहेत. परंतु, त्यातील फक्त 27 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे कालावधी उलटून गेला तरी अपूर्ण आहेत. अधिकारी व ठेकेदार संगनमत करून जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. संबंधित पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचार करणार्‍यांची चौकशी करा, अशी आक्रमक भूमिका आमदार सुनील शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात केली.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार शेळके यांनी मावळातील विविध विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले. निगडे, कल्हाट, पवळेवाडी येथे मागील काही वर्षांपूर्वी एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत.
परंतु, अद्यापपर्यंत या भागात उद्योग आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनाही काही करता येत नाही. तसेच, या भागात इको-सेन्सिटीव्ह झोनदेखील आहे. हा झोन काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि उद्योग विभाग यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

ट्रान्सफॉर्मर चोरीवर आळा घाला

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर वारंवार चोरीला जात असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवीन ट्रान्सफार्मर मिळण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते. वारंवार ट्रान्स्फॉर्मर चोरीला जात असल्याने ही जबाबदारी कोणाची? असा सवाल करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी नवीन उपकेंद्र, विद्युत रोहित्र, वीज वाहिन्या सक्षम करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणीही आमदार शेळके यांनी केली.

जनरल मोटर्स कामगारांबाबत अधिवेशन संपण्याआधी निर्णय घ्या औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील 882 कामगार मागील 71 दिवसांपासून आपल्या परिवारासह साखळी उपोषण करीत आहेत. तरी या ठिकाणी नव्याने येणार्‍या ह्युंदाई मोटर्स कंपनीत या कामगारांना रोजगार मिळावा या प्रश्नावर मार्ग काढून अधिवेशन संपायच्या आधी निर्णय घ्यावा, आणि कामगारांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार शेळके यांनी केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT