पुणे

औद्योगिक परिसराचे करणार सर्वेक्षण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्‍या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील 75 हजार औद्योगिक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. राज्यातील इतरही महापालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.15) विधान परिषदेत सांगितले.
नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेदरम्यान आमदार उमा खापरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

त्या चर्चेस आमदार सचिन अहिर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला. या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जोतिबानगर, तळवडे येथील राणा इंजिनियरिंग येथील स्पार्कल फायर कॅण्डल तयार करण्याच्या कारखान्यात शुक्रवारी (दि.8) स्फोट होऊन एकूण 11 महिला कामगार मृत्युमुखी पडल्या. सहा कामगार जखमी झाले. या घटनेच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पाहणी केली.
ज्याठिकाणी दुर्घटना घडली तेथे कच्चे बांधकाम असलेल्या इमारती व एक शटर असलेल्या शेडमध्ये औद्योगिक कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले.

या कारखान्यात शोभेच्या दारूपासून वाढदिवसासाठी वापरण्यात येणारे स्पार्कल कॅण्डल तयार करण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी व्यवसाय मालकाद्वारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. हा व्यवसाय अवैध असून परवानगी घेतलेली नव्हती. ही जागा रेड झोनमध्ये समाविष्ट असून, तळवडे परिसरात साधारणपणे 3 हजार विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न केल्याने घटना घडली.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंपनीवर कामगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन झाले आहे. त्यासंदर्भात कारवाई झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. अपघात झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. कंपनींच्या आत व परिसरातील अवैध कामांवर निर्बंध घालण्यात येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT