पुणे

Pune News : सक्तीने होणार भूसंपादन; रिंगरोडबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावित (एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्त्यातील (रिंगरोड) पश्चिम भागातील 13 गावांतील भूसंपादन आता सक्तीने करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एमएसआरडीसी, भूसंपादन अधिकारी आणि प्रांत अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर या वेळी पोलिसांच्या हस्तक्षेपात सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाधित शेतकर्‍यांना नोटीस पाठवून 21 ऑगस्टपर्यंत संमतीपत्रे देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. परंतु, नोटीसची मुदत संपुष्टात आल्यानंतरही मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील 13 गावांमधील स्थानिकांनी अद्याप संमतीपत्र दिलेले नाही. परिणामी, भूसंपादनास विलंब होत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भागांत भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पूर्वभागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. मुदतीत संमतीपत्र देणार्‍यांना 25 टक्के अधिक मोबदला देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

या कारणांमुळे संमतीपत्र रखडले

बाधितांना नोटीस पाठविल्यानंतर सामाईक क्षेत्र असल्याने परस्पर मतभेद, वाद, तसेच मृत्यू नोंद, वारसा नोंद त्यांची कागदपत्रांची उपलब्धता, सातबार्‍यावरील नाव असलेल्या व्यक्ती परगावी असल्याने विलंब, तसेच जागा, क्षेत्रफळावरून असलेले कौटुंबिक वाद, कागदोपत्री झाले नसलेले फेरफार अशा कारणांमुळे संमतीपत्र रखडले आहेत.

रिंगरोडच्या पश्चिम मार्गावरील 34 गावे बाधित होत असून, भूसंपादनाबाबत स्थानिकांना नोटीस बजावण्यात आल्या. गावांमध्ये निवाडा प्रक्रिया राबवून दर निश्चितदेखील करण्यात आले. मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील 13 गावांतील स्थानिकांनी संमतीपत्रच दिलेली नाही. पुढील भूसंपादनासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही, त्यांना अंतिम नोटीस पाठवून सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.

तीन तालुक्यांतील 13 गावे

मावळ : उर्से, पांदली, बेबेडहोल, धामणे, पाचाने आणि चांदखेड
मुळशी : केमसेवाडी, अंबडवेट आणि जवळ
हवेली : खामगाव, मांडवी, मोरलेवाडी आणि थोपटेवाडी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT