पुणे

महामेट्रोचा सर्वंकष वाहतूक आराखडा : विभागीय आयुक्तांच्या दालनात झाली बैठक

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर, उपनगरे आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दींचा विस्तार, परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी विकासकामे आणि वाढणारी लोकसंख्या पाहता वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रोने सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी महामेट्रोने एलएनटी या खासगी कंपनीचे साहाय्य घेतले आहे. त्यानुसार दोन्ही संस्थांकडून येत्या सहा महिन्यांत वाहतुकीसंदर्भात दीर्घकालीन उपाययोजनेसाठी सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.

यासंदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 12 एप्रिल) विशेष बैठक पार पडली. या वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि इतर वाहतुकीसंदर्भातील विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली गावे, उपनगरांमध्ये आणि पीएमआरडीएमध्ये सुरू असणारी बांधकामे आणि विकासकामे यानुसार विकास आराखडे (डीपी) तयार करण्यात येत आहेत. तसेच, वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महामेट्रो विस्तारीकरण, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) आणि विमानतळ विस्तार आदी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यातच जिल्ह्यात वर्षाला सव्वा लाख लोकसंख्येची भर पडत आहे. त्यामुळे वाहतुकीचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तासाला दुचाकी, चारचाकी, बस, ट्रक, तीनचाकी अशी किती वाहने धावतात. कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळेला किती काळ वाहतूक समस्या निर्माण होत आहे. प्राधान्यक्रमानुसार कोणत्या ठिकाणी नियोजन करणे आवश्यक आहे, याची माहिती घेऊन सर्वंकष अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पुलकुंडवार यांनी दिली. पुलकुंडवार म्हणाले, 'पुण्यात सुरू असणारी विकासकामे, प्रस्तावित कामे पाहता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, वाहतूक समस्या वाढली आहे. त्यानुषंगाने महामेट्रो आणि एलएनटी कंपनीकडून तयार करण्यात येणार्‍या आराखड्यामध्ये सर्व विभागांच्या अडचणी महत्त्वाच्या आहेत. त्यानुसार महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्या डीपीमध्ये नियोजित रस्त्यांच्या ठिकाणी आवश्यक ते बदल किंवा सुधारणा, याबाबत माहिती देऊन बदल करण्यात येईल.'

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT