पुणे

गर्भवतीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ; डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत केले उपचार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गर्भवती महिलेची तिसर्‍यांदा सिझेरिअन प्रसूती करताना गर्भाशयाची वार मूत्राशयात शिरल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती. कमला नेहरू रुग्णालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. अतिदक्षता विभागातील 21 दिवस उपचारांनंतर आई आणि बाळाला सुखरूपरीत्या घरी सोडण्यात आले.
जेजुरीमधून एका गर्भवती महिलेची उपचारांसाठी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात रवानगी करण्यात आली. महिलेची यापूर्वी तीनदा गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच दोनदा सिझेरिअन प्रसूती झाल्या आहेत. तिसर्‍यांदा सिझेरिअन शस्त्रक्रिया करणे अतिशय जोखमीचे काम होते.

गर्भवती महिला 20 जून रोजी सायंकाळी कमला नेहरू रुग्णालयात दाखल झाली. तेव्हा तिला प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वाडाटे आणि डॉ. आरती शिरसाठ यांनी प्रसंगावधान बाळगून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाची वार मूत्राशयाच्या पिशवीमध्ये शिरल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेतील संभाव्य गुंतागुंत लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने रक्ताच्या सहा पिशव्या मागविल्या. शस्त्रक्रिया सुरू असताना जवळपास 3 लिटर रक्तस्राव झाला. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.

महिलेची गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यात आली आणि मूत्राशयाची पिशवी ऑपरेशनदरम्यान पूर्ववत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेला 21 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आईची आणि बाळाची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरज वाणी, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि कमला नेहरू रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिलेची जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. कमला नेहरू रुग्णालयातून ससूनला पाठविण्यात येणार्‍या रुग्णांची संख्याही आता कमी झाली आहे.
             – डॉ. सुरज वाणी, वैद्यकीय अधीक्षक, कमला नेहरू रुग्णालय 

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT