पुणे : मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये कोल्ड्रीफ कफ सिरपचे सेवन केल्यानंतर झालेल्या बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) सतर्क झाला आहे. पुणे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांकडून विविध कंपन्यांच्या कफ सिरपचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्यामध्ये कोणतेही घातक रसायन आहे का? याचा शोध घेतला जाणार आहे.(Latest Pune News)
तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील सरेशन फार्मा या कंपनीकडून तयार केलेल्या ‘कोल्ड्रीफ’ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल या विषारी द्रव्याचे अंश असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून, त्याच्या सेवनाने मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
या प्रकरणाची दखल केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषध नियंत्रक संस्थेने घेतली असून, महाराष्ट्र एफडीएने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात ‘कोल्ड्रीफ कफ सिरप’च्या वापरावर बंदी घातली आहे. नागरिक आणि औषध विक्रेत्यांना हे औषध तातडीने वापरणे व विक्री करणे थांबविण्याच्या सूचना रविवारी जारी केल्या आहेत.
विक्रेते केवळ प्रीस्क्रिप्शनवरच औषधे देतात : बेलकर
केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी ऑनलाइन औषध विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून अनेकदा बनावट किंवा अप्रमाणित औषधे विकली जातात. शासनाकडे या व्यवहारांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अशा विक्रेत्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. परवानाधारक औषध विक्रेते केवळ डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनवरच औषधे देतात, असे बेलकर यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या एफडीएकडून मिळालेल्या निर्देशांनुसार पुण्यातील मेडिकल दुकानांतून विविध कंपन्यांच्या कफ सिरपचे नमुने घेतले जात आहेत. कोल्ड्रीफ सिरपचा साठा पुण्यात उपलब्ध नसल्याचे आढळले आहे. कोणाकडे साठा असल्यास तो त्वरित कळविण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. अद्याप कोणत्याही औषध विक्रेत्याने साठा असल्याचे कळविलेले नाही.अश्विन ठाकरे, सहाय्यक आयुक्त, एफडीए, पुणे विभाग