COEP Research And Development Pudhari
पुणे

COEP Research And Development: संशोधनावर अधिक भर द्यावा; पारंपरिक शिक्षण चौकटीबाहेर जाण्याची गरज: लिला पूनावाला

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या स्थापना दिनी बोलताना संशोधन, विकास आणि मूल्यशिक्षणावर दिला भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पारंपरिक शैक्षणिक चौकटीतून बाहेर पडून संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण, संशोधन क्षेत्रात आपण आजही मागास असल्याचे मत लीला पूनावाला फाउंडेशनच्या संस्थापक आणि सीओईपीच्या माजी विद्यार्थिनी लिला पूनावाला यांनी व्यक्त केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाचव्या स्थापना दिन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भिरूड, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. दयाराम सोनवणे आणि नियामक मंडळाचे राज्यपाल नियुक्त सदस्य भरत गीते उपस्थित होते.

पूनावाला म्हणाल्या, की प्राध्यापकांना केवळ तासिका घेण्यात अडकवून न ठेवता संयम ठेवून संशोधनासाठी त्यांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. चिखली येथे उभारलेले संशोधन आणि विकास केंद्र हे त्या दृष्टीने उचललेले एक आशादायी पाऊल आहे. अलीकडच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी विषयांबरोबर नैतिक मूल्यांचे धडे देण्याची गरज आहे. त्यांची 'पॅकेज' मनोभूमिका बदलण्याची गरज आहे. उद्याचे जबाबदार नागरिक आणि अभियंते घडविण्यासाठी शाळा पातळीवर आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

या वेळी विनायक पै म्हणाले, अभियंते हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्यांनी अधिकाधिक संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. सीओईपीच्या सर्वांगीण विकासात उद्योग क्षेत्रासह माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे.

गिते म्हणाले, की १७२ वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेली सीओईपी ही केवळ अभियंते नव्हे, तर नेतृत्व घडविणारी संस्था आहे. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भिरूड यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सांडीझोड, मोहन खोंड, महेश सिंदगीकर यांनी केले. डॉ. दयाराम सोनवणे यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT