पुणे: देशातील युवा सध्याच्या राजकारणाला कंटाळला असून, त्यांचा सरकारवर रोष तयार झाला आहे. यंत्रणा सडलेली असल्याने कॉकरोचचा उगम झाला आहे. यंत्रणेला नीट करण्याची वेळ आली असून, ते काम कॉकरोच करणार आहे. दिल्ली येथील जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्याची विनंती केली होती.
मात्र, ती अद्याप स्वीकारली नाही. येत्या शनिवारपर्यंत प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर येत्या २० तारखेला मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होऊन राजीनामा घेऊ. जोपर्यंत राजीनामा देणार नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहणार, असा निर्धार 'कॉकरोच जनता पार्टी'चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी केला. आम्ही सर्व जण जेलमध्ये जायला तयार, पण प्रधान यांचा राजीनामा घ्या, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
देशातील नीट परीक्षेसह सीबीएसई आणि अन्य परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील घोटाळ्यांच्या विरोधात 'सीजेपी'ने पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शांतीपूर्ण आंदोलन केले.
दीपके यांनी आपल्या भाषणातून परीक्षा यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत, सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढविला. सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासह हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.
जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतात, जय भीमच्या घोषणा देतात ते अराजक आहेत का, असा प्रश्न उपस्थित करतानाच मला संविधान माहीत नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले, तर बहुमत नसताना पहाटे पाच वाजता शपथ घेणे हे संविधानात कुठे लिहिले आहे हे त्यांनी स्पष्ट करावे, असे दीपके यांनी नमूद केले.
देशाच्या महागुरूंना आज आम्ही विचारू इच्छितो की, त्यांना देशातील विविध प्रवेश परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करणारे ते एक कोटी विद्यार्थी महत्त्वाचे आहेत की त्यांचे एक मंत्री? असा प्रश्न उपस्थित करत दीपके म्हणाले, देशातील विद्यार्थी, विरोधी पक्ष तसेच प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना सरकार पाकिस्तानी बोलत आहेत.
मग भारतीय जनता पार्टीचे आयटी सेल भारतीय आहेत का. विद्यार्थ्यांना पाकिस्तानी बोलणाऱ्यांना लाज वाटायला हवी. वांगचूक यांनाही ॲण्टी नॅशनल पाकिस्तानी म्हणून जेलमध्ये टाकले होते. सर्व जग एआय, सेमी कंडक्टर तसेच क्लीन एनर्जीमध्ये पुढे चालले आहे. मात्र, आपण हिंदू-मुस्लिममध्ये अडकलोय. कोणीही त्यामध्ये अडकू नका. हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तानचे राजकारण चालणार नाही.
शैक्षणिक दुरवस्थेवरील चीड झाली व्यक्त
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या... राजीनामा द्या, अभिजित तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे, नीट काय नीट नाही, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पेपर फोडतोय धर्मेंद्र... अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. भाषण, घोषणाबाजी, गाणी आणि समाजमाध्यमांवर देखील व्यक्त होत 'कॉकरोच'ने शैक्षणिक दुरवस्थेवरील चीड व्यक्त केली.
'सीजेपी'च्या प्रमुख मागण्या
पेपर लीक, रद्द तसेच पुढे ढकलल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये देण्यात यावेत.
विद्यार्थ्यांचा ट्रेन, बस आणि राहण्याचा खर्च तसेच मानसिक त्रासापोटी ताबडतोब दहा हजार रुपये द्यावेत.
निकालास विलंब झाल्यास प्रतिमहिना दहा हजार रुपये देण्यात यावेत.
परीक्षा रद्द करावी लागल्यास ७२ तासांच्या आत पुन्हा परीक्षा घ्यावी.
उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणीऐवजी व्यक्तिश: तपासणी करण्यात यावी.
उशिरा होणाऱ्या परीक्षा हे सरकारचे अपयश असल्याने त्यांसाठी वयोमर्यादेत सवलत द्यावी.
एनसीईआरटीने पुस्तकातून जो नकाशा काढला तो परत समाविष्ट करण्यात यावा.