Chief Minister inaugurates University Square flyover
पुणे: पीएमआरडीएकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उभारलेल्या एकात्मिक दुमजली पुलाचे लोकार्पण बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन झाल्यामुळे आज गुरुवारपासून (दि. 21) या पुलाची औंध ते शिवाजीनगरकडील बाजू वाहनचालकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहराचे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मुख्य अभियंता रिनाज पठाण आदी उपस्थित होते. उड्डाण पुलावर कोनशिलेचे उद्घाटन फीत कापून केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सारथ्य करीत असलेल्या गोल्फ कार्ट (बॅटरीवरील गाडी) मध्ये बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिरोळे यांनी उड्डाणपुलावरून प्रवास केला. (Latest Pune News)
एकात्मिक दुमजली उड्डाणपूल खर्च 277 कोटी
पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी केली असून, यासाठी अंदाजित 277 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे.
पाषाणकडील बाजू ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत
या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध-शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कार्यक्रमापूर्वी रंगले घोषणायुद्ध
उड्डाणपुलाच्या उद्घाटनापूर्वी येथे उभारलेल्या मंडपात जोरदार घोषणायुद्ध रंगले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावाचा जोरदार जयघोष केला. हे पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. श्रेय घेण्यासाठी ही घोषणाबाजी केल्याची चर्चा उपस्थितांत होती.