CM Devendra Fadnavis on Shaktipeeth Mahamarg
पुणे : नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. हा महामार्ग आम्ही करणार आहोत. याबाबत जे अडचणीचे मुद्दे आहेत. त्यावर चर्चेतून मार्ग काढला जाईल. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सांगलीपर्यंतची ६० ते ७० टक्के जमिनी कोणत्य़ाही अडथळ्याशिवाय मिळालेली आहे. २० ते ३० टक्के जागेसाठी चर्चा करावी लागेल. शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या जातील. कोल्हापूरसंदर्भात जी अलायनमेंट आहे. त्याबद्दल लोक आम्हाला भेटून जमिनी घ्या म्हणून सांगत आहेत. त्याबद्दल निवेदने देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.४ ) पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या इगो समाधानासाठी करण्यात येणार नाही. हा महामार्ग मराठवाडा आणि राज्यातील सर्व दुष्काळी जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटनांतून रोजगाराची निमिर्ती होणार आहे. महामार्गाच्या १०० किलोमीटरच्या अंतरात ५०० ते १००० शेततळे तयार करणार आहोत. नाल्यावर बंधारा निर्माण करणार आहोत. त्यामुळे जलसंवर्धनाचे काम हा महामार्ग करेल. मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रीन हायवे मुळे दुष्काळी भागाला मदत होणार आहे. महामार्गाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांनाही आम्ही चर्चेसाठी वेळ देऊ आणि विरोध करणाऱ्या लोकांचेही आम्ही ऐकून घेऊ.
समृद्धी महामार्गाला लोकांपेक्षा जास्त विरोध नेत्यांनी केला. आता हे सर्वजण या महामार्गावरून प्रवासही करतात.आणि प्रशंसाही करत आहेत. त्यामुळे कोणतेही नवीन काम हातामध्ये घेतले. तर त्यावर गैरसमज होतात. विरोध होतो. सर्वच प्रकल्प बंद केले. तर महाराष्ट्राचा विकास कधीच होणार नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्या कामाला लोकांचा अधिक पाठिंबा आहे, ती कामे केलीच पाहिजे. या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे. पण राजकीय लोक यामध्ये राजकारण करून त्याला वेगळ्या दिशेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता आम्हाला साथ देईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून गुंडगिरी चालू देणार नाही. मराठी मुलांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेणार आहे. व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात व्यापार करू नये का ? एखादा मराठी व्यापारी हा आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला आसामी भाषा शिकण्यास वेळ लागला तर त्याला आसामी लोकांनी मारहाण करायची का ? त्यामुळे अशा प्रकारे कोणालाही मारहाण करणे योग्य नाही. तुम्हाला खरंच मराठीचा अभिमान असेल तर आपल्या मुलांना मराठी शिक्षण द्या, मराठी शिकवा. त्रिभाषा धोरणासाठी आम्ही समिती नेमली आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. पण इतर भाषांवर अन्याय करायला नको. मराठी भाषेचा आग्रह करू शकतो. पण दुराग्रह करू नका, असे फडणवीस म्हणाले.
याचा मराठी माणसांनी अटकेपार झेंडा नेला आहे. याच मराठी माणसांनी स्वातंत्र्य मिळविले आहे.मोघली सत्ता घालवून दिल्लीवर भगवा झेंडा फडकविण्याचे काम मराठी माणसांनी केलेले आहे. विरोधकांवर मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांचा लोकांशी कोणताही संबंध राहिलेला नाही.