पुणे

Pune Ajit Pawar Statue : ‘दादा असते तर दुष्काळाशी दोन हात केले असते...’; अजितदादांच्या आठवणीत मुख्यमंत्री फडणवीसांचा कंठ दाटला

अपघात की घातपात, याचा संभ्रम लवकरच दूर होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आश्वासनानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ‘अनेक वेळा आपण एखाद्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला जातो तेव्हा मनात आनंद असतो, मात्र आजचा कार्यक्रम वेगळा आहे. ज्यांचे नेतृत्व बहरत होते आणि संपूर्ण आयुष्य जगण्याची ज्यांच्याकडून अपेक्षा होती, ते दादा आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मनात आठवणींचे काहूर माजले आहे. त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा आनंद तर आहेच, पण ते आज आपल्यात नाहीत याचे मनस्वी दुःख आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

याप्रसंगी अजित पवार यांच्या निधनासंदर्भात जनमानसात असलेल्या संभ्रमावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, नेमके काय घडले, हा निव्वळ अपघात आहे की यापाठीमागे काही घडले आहे, याची स्पष्टता यावी अशी चर्चा सातत्याने महाराष्ट्रातील जनमानसात सुरू आहे. या घटनेला आता आठ-दहा महिने उलटून गेले असून, याप्रकरणी मोठी चौकशी सुरू आहे. या तपासात अमेरिकेसारख्या राष्ट्रातील तज्ज्ञांचेही सहकार्य घेतले जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील हा संभ्रम कायमचा दूर झाला पाहिजे, यासाठी हा चौकशी अहवाल लवकरात लवकर समोर आला पाहिजे, अशी विनंती आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या प्रकरणात जर कोणी दोषी असेल, तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आले पाहिजे आणि जर हा खरोखरच अपघात असेल, तर आमच्या आक्रोशावर फुंकर पडली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांनी हा अहवाल लवकरात लवकर आणण्याचे आश्वासन दिले असून, त्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवार यांच्या कुटुंबीयांना धीर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंबीर साथ देण्याची ग्वाही दिली. अजित दादांसारखा दुसरा नेता नाही आणि त्यांच्यासारखा सहकारी दुसरा कोणी होऊ शकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका मोठ्या संघर्षातून तयार झालेले हे नेतृत्व होते. त्यांनी जे कार्य अर्धवट सोडले आहे, ते पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनी असतील किंवा त्यांचे संपूर्ण कुटुंबीय असतील, या सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून पुढील काम करत राहू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT