मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दशरथ राऊतांच्या हॉटेलमध्ये चहा घेतला.  Pudhari Photo
पुणे

मुख्यमंत्र्यांनी जपली ३५ वर्षांची मैत्री; इंदापुरातील दशरथ राऊतांच्या चहाचा घेतला आस्वाद

Devendra Fadnavis visit Indapur | श्री लक्ष्मी नृसिंहाची केली मनोभावे पूजा

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३५ वर्षांची मैत्री जपत दशरथ राऊतांचा आज (दि.२९) चहा घेतला. नागपूरचे नगरसेवक असल्यापासून फडणवीस दर्शनाला आल्यावर राऊतांचा चहा घेतात. ही परंपरा तीन वेळा मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांनी कायम ठेवली आहे. (Devendra Fadnavis visit Indapur)

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे फडणवीसांचे कुलदैवत आहे. त्यांनी आज या ठिकाणी आपल्या कुलदैवताचे दर्शन घेतले. लक्ष्मी नृसिंहाला अभिषेक देखील केला. यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करून फडणवीस मंदिराच्या बाहेर पडले. घाई गडबड असताना देखील फडणवीसांनी आपली पावले दशरथ राऊत यांच्या हॉटेलकडे वळवली आणि आपल्या आवडीचा असणारा राऊत यांच्या चहाचा आस्वाद घेतला.

राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेली ३५ ते ४० वर्षांची मैत्री आहे. ज्या ज्या वेळी फडणवीस या ठिकाणी दर्शनाला येतात. त्यावेळी ते माझ्याकडे चहा घ्यायला येतात. मी म्हणतो साहेब चहा घेणार का? आणि ते म्हणतात तुझा चहा पिल्याशिवाय मी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी दशरथ राऊत यांनी दिली.

फडणवीस यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि नगरसेवक झाले. तेव्हापासून लक्ष्मी नृसिंहाला आले की फडणवीस राऊत यांच्या हॉटेलवर जातात आणि मनमुराद चहाचा आस्वाद घेतात. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी हे मैत्रीचे नाते अतूट जपले आहे. आज देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही आणि राज्याचा प्रमुख असल्यानंतरही राऊतांच्या टपरीवर जाण्याचा आणि चहाचा आस्वाद घेण्याचा नियम काही त्यांनी मोडला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT