CM Devendra Fadnavis  Pudhari
पुणे

Pune Illegal Hoardings: ‘माझेही नाव पुरस्कारांच्या...’ फडणवीसांचा बेकायदा होर्डिंग्जवरून नेत्यांना टोला; पुण्यातील कारवाईचे केले कौतुक

Pune Illegal Hoardings: पुण्यातील बेकायदा होर्डिंग्ज आणि अतिक्रमणाविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.

Rahul Shelke

Pune Illegal Hoardings: पुणे शहरात सध्या अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंग्जविरोधात महापालिका प्रशासनाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आहे. शहरातील रस्ते, पादचारी मार्ग आणि सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी मोकळ्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे असणे आवश्यक आहे. नियम केवळ सरकारी कागदपत्रांमध्ये लिहिण्यासाठी नसतात, तर त्यांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. या नियमांचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करणे हा आहे.

‘पुणेरी’ संकल्पनेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

बेकायदा होर्डिंग्जची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशातील अनेक शहरांमध्ये ही समस्या दिसून येते. त्यामुळे अशा होर्डिंग्जविरोधात नियमित आणि सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. पुणे महापालिका प्रशासनाने यासाठी स्वीकारलेली अभिनव आणि खास ‘पुणेरी’ पद्धत कौतुकास्पद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. ते म्हणाले, "पुणे प्रशासनाला मी एवढेच सांगेन की, उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!" त्यांच्या या विधानाची विशेष चर्चा होत आहे.

नागपूरमध्येही बेकायदा होर्डिंग्जविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन

येत्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या काळात नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागपूर महापालिका आणि प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

शहराचे सौंदर्य खराब होणार नाही आणि सार्वजनिक जागांवर बेकायदा होर्डिंग्ज लागणार नाहीत, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी कायम जनतेमध्ये दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असा संदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT