भीमाशंकरच्या 288 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता; तातडीने अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना (File Photo)
पुणे

CM Fadnavis: भीमाशंकरच्या 288 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता; तातडीने अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सह्याद्री अतिथिगृह येथे श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा संदर्भातील आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना निर्देश दिले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या वेळी श्रीक्षेत्र भीमांशकर विकासाच्या (कुंभमेळा 2027-गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) 288.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

सह्याद्री अतिथिगृह येथे श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा संदर्भातील आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना निर्देश दिले. बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. (Latest Pune News)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्यने भाविक आणि पर्यटक येतात. त्यांना केंद्रबिंदू मानून याठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील विकासाची कामे पूर्ण करावी, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा आणि कामे सुरू करण्यात यावी.

भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इकोटुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करुन वनभ्रमण पथ तयार करावे. त्याचसोबत पर्यटक, भाविकांसाठी रोप-वेची सुविधा विकसित करावी.

निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणार्‍या सर्व सुविधा हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूकमार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच याठिकाणी हेलीपॅड सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करावे.

या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध करून द्यावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघर- भीमाशंकर महामार्ग हा सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारावी, तसेच अखंडित वीजपुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी द्यावे.

या वेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT