ढगाळ वातावरणामुळे अंजीरफळांचा दर्जा घसरला Pudhari
पुणे

Anjir farming Purandar: ढगाळ वातावरणामुळे अंजीरफळांचा दर्जा घसरला; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता

पुरंदर तालुक्यातील अंजीर बागांना हवामानाचा फटका; बाजारभाव घसरले, काही ठिकाणी करपा-तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

पुढारी वृत्तसेवा

दिवे : पुरंदर तालुक्यात अंजिराचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. तालुक्यात साधारणत: 352 हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड असल्याची माहिती तालुका उप कृषी अधिकारी गणेश जगताप यांनी दिली. परंतु, यावर्षीच्या ढगाळ वातावरणाचा अंजीरफळांना फटका बसला आहे. परिणामी, अंजीर उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.(Latest Pune News)

अंजीरफळ हे कॅल्शियमयुक्त फळ आहे. भरपूर प्रथिने असलेल्या अंजिराला विशेष मागणी असते. खास करून पुरंदरचा अंजीर हा आपल्या अप्रतिम चवीने देशभरात प्रसिद्ध आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे, गुऱ्होळी, सिंगापूर, वाघापूर, भिवडी, पिंपळे, सोनोरी, वाल्हे तसेच खेड शिवापूर, गोगलवाडी आदी भागांत अंजीर उत्पादन घेतले जाते. पुरंदर येथे पिकणाऱ्या अंजिराला विशेष चव आणि गोडी असल्याने याला पुणे, मुंबई येथील ग्राहकांकडून विशेष मागणी असते.

अलीकडच्या काळात वातावरणातील बदलाचा अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अंजिराला एकरी साधारण एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो. सध्या खट्‌‍ट्या हंगामाला सुरुवात झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला बाजाभाव मिळत असतानाच ढगाळ हवामान आणि मागील आठवड्यात झालेला पाऊस, यामुळे मालाचा दर्जा घसरून बाजारभाव देखील कमी झाला आहे. मुंबई बाजारपेठेत चार डझनाच्या एका बॉक्सला अगदी 150 ते 200 रुपये बाजारभाव मिळत आहे. काही शेतकरी स्थानिक बाजारपेठेत आपला माल विकतात. तेथेही बाजारभाव घसरले आहेत. शिवाय तोडणी केलेला माल उकलल्याने अगदी 40 टक्के फेकून द्यावा लागत आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

काही बागांवर करपा व तांबेरा रोगाचा देखील प्रादुर्भाव झाला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मुंबई (वाशी) मार्केटमध्ये ढगाळ वातावरणामुळे अंजिराची आवक वाढली आहे. शिवाय मालाचा दर्जा घसरल्याने ग्राहकांकडून मागणी कमी आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव कमालीचे घसरले आहेत.
वैभव नलावडे, फळविक्रेते, वाशी मार्केट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT