राजेंद्र गलांडे
बारामती: ‘ग्रामपंचायत ते लोकसभा, प्रत्येक निवडणूक आम्ही लढवणार,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून यापूर्वी वेळोवेळी जाहीर करण्यात आले आहे. परंतु गत महिन्यापासून दोन्ही पवारांमध्ये जवळीक वाढली असून ते एकत्र येण्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू इच्छिणार्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था असल्याचे चित्र बारामतीत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीला आता दोन वर्षे होत आली आहेत. पक्ष फुटीनंतर सुरुवातीला लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक पार पडली. बारामतीकरांनी या दोन्ही निवडणुकांत वेगवेगळा कौल दिला. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमनेसामने आले.
कार्यकर्त्यांची उमेद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांनी आम्ही प्रत्येक निवडणुका लढवू असे वेळोवेळी सांगितले होते, परंतु त्यानंतर छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत हा पक्ष अलिप्त राहिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आगामी 4 महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक आयोगाने मुदतवाढीकरता न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे दोन्ही पवारांमधील जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. (latest pune news)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यापासून ती अधिकाधिक वाढत चालली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही एकत्रित येण्याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात टोलावला आहे.
सातार्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुळे यांच्यात झालेला हास्यविनोद, सोमवारी (दि. 12) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेली चर्चा यामुळे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. या परिस्थितीत दोन्हीकडील इच्छुक कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत. नेमके काय करावे, हेच कार्यकर्त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे निवडणुकांची तयारीही करता येईना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बारामतीत कार्यकर्त्यांची बेचैनी वाढली
गेली दोन वर्षे आपापल्या पक्षासाठी बारामतीत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. प्रसंगी वाईटपणाही घेतला आहे. आता दोन्ही पवार एकत्र आले तर कार्यकर्त्यांच्या ते कितपत पचनी पडेल हाही प्रश्न आहे. बारामतीत या दोन्ही राष्ट्रवादींची चांगली ताकद होती.
भाजपची ताकद अलीकडील काळात वाढली आहे. अन्य पक्षांची तेवढी ताकद नाही. परिणामी दोन्ही राष्ट्रवादीतच निवडणुकांत घमासान होणे शक्य आहे, परंतु आता मनोमिलनाचे संकेत येऊ लागल्याने कार्यकर्त्यांची बेचैनी वाढली आहे.