आशिष देशमुख
पुणे: हवामानातील लहरी बदल हे झाडांमधील कार्बन शोषण आणि साठवणक्षमता कमी होण्यास जबाबदार आहेत. तसेच, मान्सूनचा लहरी पॅटर्न देखील वातावरणातील कार्बनवाढीस जबाबदार असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
आज बुधवारी (दि. 22 एप्रिल) जागतिक वसुंधरा दिन, त्यानिमित्त वातावरणबदलाचा दै. ‘पुढारी’ने घेतलेला हा आढावा. जंगलातील कार्बनबदलांना आकार देण्यात तापमानापेक्षाही पर्जन्यमानातील बदल राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
पर्जन्यमानाचे परिणाम बहुतांशवेळा त्वरित न दिसता अनेक वर्षांनी दिसू शकतात. भविष्यातील वन नियोजन, कार्बनशोषक धोरणे आणि हवामान अनुकूलतेसाठी प्रादेशिक हवामानाचे नमुने, विशेषतः पर्जन्यमान समजून घेण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
अभ्यासात काय आढळले?
‘विविध उत्सर्जन मार्गांनुसार भारतीय वन कार्बनसाठ्याची गतिशीलता आणि भविष्यातील अंदाज’ या शोधनिबंधात ज्येष्ठ हवामान संशोधक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल, फातिमा फिथा जे. मरीना मॅथ्यू, प्रमितकुमार देब बर्मन, लक्ष्मी एम. एस. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे), राजीवकुमार चतुर्वेदी (बीटस पिलानी, गोवा) आणि नितीन चौधरी (लुंड विद्यापीठ, स्वीडन) यांनी प्रथमच हे संशोधन जगाला दिले असून, यात अनेक वेगळ्या बाबी प्रथमच समोर आल्या आहेत.
शास्त्रज्ञांनी काढलेले हे निष्कर्ष
जिवंत वनस्पती सृष्टीतील कार्बन शोषून तो आपले खोड, फांद्या, पाने आणि मुळांमध्ये साठवतात, ही क्षमताच कमी होत आहे. वन कार्बन हा ‘जिवंत बायोमास’ आहे. यात मृत लाकूड, पालापाचोळा किंवा जमिनीतील कार्बनचा समावेश नाही. भारताच्या वनव्याप्त प्रदेशांमध्ये जिवंत वन कार्बनचे प्रमाण ऐतिहासिक काळात 7.74 किलोग्राम प्रतिचौरस मीटर होते. ही वाढ देशभरात समान प्रमाणात नाही.