पुणे/बिबवेवाडी : शहरात परवानगीशिवाय फ्लेक्स, बोर्ड किंवा बॅनर लावल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध महानगरपालिकेने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत तब्बल 27 जणांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत. तर 71 जणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. (Latest Pune News)
शहरात शहरात परवानगीशिवाय फ्लेक्स, बोर्ड किंवा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांना हे आदेश दिल्यानंतर स्वत: अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., उपायुक्त माधव जगताप आणि पाचही झोनल उपायुक्त गेल्या दोन दिवसांपासून कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मागील चार ते पाच दिवसांत शहरातील पाच हजारांहून अधिक बेकायदा बोर्ड, बॅनर्स हटविण्यात आले आहेत. तर 71 प्रकरणांत पोलिसांना गुन्हे दाखल करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
यापैकी 27 प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स बॅनर व अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघातांची शक्यता वाढते तसेच
शहराचे विद्रूपीकरण होते. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड आणि बॅनरवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. (Latest pune news)
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व पाठोपाठ आता दिवाळी आली आहे. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबतच, राजकीय पदाधिकारी व व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर शहरात बेकायदा फ्लेक्स व बॅनरबाजी केली जात आहे. मात्र, अधिकारी केवळ व्यावसायिकांच्या बॅनर्सवरही कारवाई करत असून, राजकीय पक्षांच्या बॅनर्सवर मोजकीच कारवाई केली जात आहे, असा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
शहरातील कोणत्याही भागात अनधिकृत फ्लेक्स किंवा बॅनर लागणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय सहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. जर कुठे अनधिकृत फ्लेक्स आढळले, तर संबंधित सहाय्यक आयुक्तांनाच यापुढे जबाबदार धरले जाणार आहे. तसेच, पोलिस विभागाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, 1995’अंतर्गत अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात प्रथापूर्वक तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अनधिकृत फ्लेक्स बॅनर व अनधिकृत जाहिराती लावणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 71 जणांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले असून, आतापर्यंत 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका