पुणे : पावसामुळे शहरातील काही भागात अशुद्ध व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात येणार्या पाण्याच्या (येवा) प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसामुळे पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात माती व गाळ धरणांमध्ये जमा होत आहे. परिणामी, धरणातील पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. महापालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्रामार्फत पाण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, सध्या पाण्यातील गढूळपणाची पातळी ही जलशुद्धिकरण केंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पुरवले जाणारे पाणी अपेक्षित पारदर्शकतेने शुद्ध करता येत नाही.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून, गाळून वापरण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नव्याने महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, खडकवासला, सणसनगर, धायरी, नर्हे या परिसरात शुद्धिकरणाऐवजी केवळ निर्जंतुकीकरण केलेले पाणी पुरवले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.