अशोक मोराळे
पुणे: शहरात घरफोड्या करणारे चोरटे पोलिसांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या साडेतीन वर्षांत चोरट्यांनी पुणेकरांचा तब्बल 73 कोटी 60 लाख रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. त्यातील केवळ 13 कोटी 41 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना चोरट्यांच्या ताब्यातून परत मिळविता आला आहे, तर दुसरीकडे घरफोडीच्या दाखल होणार्या गुन्ह्यांच्या तुलनेत उघड होण्याचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी असल्याचे दिसते. त्यामुळे ‘पोलिस हतबल, पुणेकर कंगाल आणि घरफोडे मालामाल’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मागील काही दिवसांपासून पुणेकर घरफोड्या करणार्या चोरट्यांच्या उपद्रवाने हैराण झाले आहेत. कष्टाने मिळवलेली जमापुंजी हे चोरटे लंपास करीत आहेत. पोलिसदफ्तरी नोंद असलेल्या आकडेवारीनुसार, 2022 ते जून 2025 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत चोरट्यांनी पुणेकरांची घरे फोडून 73 कोटी 60 लाख 47 हजार 187 रुपयांचा ऐवज चोरी केला. त्यामध्ये रोकड, सोने-चांदी आणि हिर्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे. (Latest Pune News)
त्यापैकी पोलिसांना केवळ 13 कोटी 41 लाख 69 हजार 251 रुपयांचाच ऐवज चोरट्यांकडून परत मिळविण्यात यश आले. टक्केवारीत बोलायचे झाले तर हे प्रमाण केवळ 18.23 च्या घरात आहे. दुसरीकडे, दरम्यानच्या कालावधीत विविध भागांत 2 हजार 19 घरफोडीचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल झाले असून, पोलिसांना केवळ 886 गुन्ह्यांचाच छडा लावण्यात यश आले आहे.
हे प्रमाण टक्केवारीत 43.88 आहे. म्हणजेच अद्यापही पोलिसांना निम्म्यापेक्षा अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावता आलेला नाही. जून 2025 अखेर अवघ्या सहा महिन्यांत 275 घरफोड्या शहरात झाल्या आहेत. त्यातील अवघ्या 67 घरफोड्या करणार्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले आहे. म्हणजेच अद्याप 204 चोरटे फरार आहेत.
यावरून शहरातील घरफोड्यांचे गांभीर्य लक्षात येते. शहराच्या वाढत्या परिघाबरोबरच नागरीकरण वाढत आहे. आयटी हब, शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त राज्यातील इतर भागांतील तसेच परराज्यांतील नागरिकही पुण्यात वास्तव्यास आहेत. नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक ठिकाणी घरातील दोन्ही व्यक्ती बाहेर असतात. त्याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांकडून घरफोड्या केल्या जात आहेत.
शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले असले तरी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात हवे तेवढे यश आल्याचे दिसून येत नाही. दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनात मोठी वाढ होताना दिसते आहे. बंद घरे प्रामुख्याने चोरट्यांच्या टार्गेटवर असल्याचे दिसून येते. चोरटे दिवसा रेकी करून रात्री घरावर हात साफ करीत आहेत. गेल्या काही दिवसांत भरदिवसा देखील घरफोड्या होऊ लागल्या आहेत.
परिमंडल 5 मध्ये सर्वाधिक घरफोड्या
वेगाने विस्तारलेली उपनगरे, दाटीवाटीची संमिश्र लोकवस्ती असलेल्या परिमंडल 5 मध्ये गेल्या साडेतीन वर्षांत सर्वाधिक घरफोड्या झाल्या आहेत. दरम्यानच्या काळात या परिसरात 822 घरफोड्या झाल्या असून, त्यातील केवळ 334 घरफोड्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे.
गुन्हे शाखा, स्थानिक डीबी पथके ढेपाळली
पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र तपास पथक असते, तर गुन्हे शाखेच्या पथकांकडून दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास केला जातो. मात्र, घरफोड्यांच्या बाबतीत गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांच्या डिबी पथकांना विशेष अशी कामगिरी करता आली नसल्याचे दिसून येते.
अशी घ्या खबरदारी...
बाहेर जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
बाहेरगावी जाताना शेजार्यांना कल्पना द्या.
सोसायटीमधील अनेक व्यक्ती बाहेरगावी जाणार असतील, तर पोलिसांना त्याची कल्पना द्या.
सोसायटीमध्ये पडताळणी केलेल्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करा.
सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
घरासमोर पेपर पडू देऊ नका. चोरट्यांना फ्लॅट बंद असल्याचे समजते.
सोने, रोकड, दागिने घरात ठेवू नयेत, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत.
घराबाहेर जाताना मुख्य दरवाजाची कडी व कुलूप लावू नये. त्याऐवजी लॅचलॉकचा वापर करावा. (यामुळे चोराला घरात कोणी आहे किंवा नाही याचा अंदाज घेता येत नाही)
बाहेर पर्यटनाला गेल्यानंतर शक्यतो तेथील फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे टाळा, कारण चोरटे
त्यावरून देखील घरात कोणी नसलेल्या संधीचा फायदा घेत चोरी करतात.