नागरी समस्यांविरोधात नागरिक आक्रमक; धानोरी येथील भारतमातानगर रस्त्यावर आंदोलन Pudhari
पुणे

Civic Issues Protest: नागरी समस्यांविरोधात नागरिक आक्रमक; धानोरी येथील भारतमातानगर रस्त्यावर आंदोलन

उपाययोजना करण्याचे महापालिका प्रशासनाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

धानोरी: धानोरी-लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने विविध नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोमवारी (दि.30) आंदोलन करण्यात आले. धानोरीतील भारतमातानगर रस्त्यावर करण्यात आलेल्या या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून धानोरी -लोहगाव परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि पावसाळी वाहिन्या, कचरा व्यवस्थापन आदी समस्यांविषयी नागरिक महापालिकेकडे तक्रारी करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून उपाययोजना करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे धानोरी - लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशनने परिसरातील नागरिकांसमवेत सोमवारी भारतमातानगर रस्त्यावर आंदोलन केले. (Latest Pune News)

भारतमातानगर रस्त्याच्या दुरवस्थेकडेही या वेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिसरातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा या वेळी निषेध केला. उपायुक्त जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे गिरीश जैवाल यांनी सांगितले.

धानोरीतील भारतमातानगर रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात होत आहेत. इतर मूलभूत सुविधा पुरविण्याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या समस्या तातडीने न सोडविल्यास पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
- गिरीश जैवाल, अध्यक्ष, धानोरी-लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशन
भारतमातानगर रस्ता महापालिकेच्या ताब्यात नाही, याविषयी महापालिका आयुक्तांना कळविण्यात येईल. तसेच, संबंधित जागामालकांशी चर्चा करून या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. तसेच इतर नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.
- माधव जगताप, उपआयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT