पुणे: वैष्णवी हगवणे यांच्या हुंडाबळी प्रकरणानंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, महिला आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात शनिवारी (दि. 24) गुडलक चौकात अनोखे ‘चिल्लर फेको आंदोलन’ करण्यात आले. रूपाली चाकणकर राजीनामा द्या...! आणि चिल्लरबाई बाहेर या! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महिला आयोगाकडे मदतीसाठी अगोदर धाव घेतली होती, पण तिथून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळेच वैष्णवीचा बळी गेल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चिल्लर फार वाजायला लागली आहे, असा वक्तव्य करत आंदोलक महिला आणि मुलींचा अवमान केला. (Latest Pune News)
त्यामुळे संतप्त झालेल्या ‘बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’च्या महिलांनी चक्क त्यांच्या फोटोवर चिल्लर फेकून शनिवारी निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्काळ चाकणकरांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
जर हा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही कलेक्टर कचेरीसमोर साखळी उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात संगीता तिवारी, शोभा पणीकर, सुनिता नेमूर, रजिया शेख, प्रिया लोंढे अशा अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.