पुणे: महापालिकेचा खड्डेमुक्तीचा दावा पावसामुळे फोल ठरला आहे. 1 एप्रिलपासून शहरातील एकूण 724 खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेमार्फत करण्यात आला होता. मात्र, निकृष्ट पद्धतीने बुजविण्यात आलेले खड्डे पावसाने पुन्हा उखडले आहेत. शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, यामुळे अपघात होत असल्याचे देखील समोर आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून, पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महानगरपालिका प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे. शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, सिग्नल यंत्रणा, खाजगी कंपन्या आणि इतर कामांसाठी वर्षभर रस्त्यांवर खोदकाम केले जाते. (Latest Pune News)
जिथे खोदकाम केले जाते तिथे जास्त खड्डे तयार होतात. काही ठिकाणी रस्ते विभागाने रस्ता बांधल्यानंतरही पुन्हा रस्ते खोदल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याच कारणास्तव, यावर्षीही पुणेकरांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
या पाण्यामुळे निकृष्ट पध्दतीने बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला गेला. असे असताना देखील शहराच्या विविध भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अद्याप मोसमी पाऊस सुरू झालेला नाही. रोजचा पाऊस सुरू झाल्यानंतर तर रस्त्यांची स्थिती काय असेल, असा प्रश्न देखील पुणेकर उपस्थित करीत आहेत.
आजही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे...
पुणे महानगरपालिका प्रशासनाने गेल्या दीड महिन्यात शहरातील रस्त्यांवरील 778 पैकी 724 खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. तसेच या दाव्यानुसार, सध्या शहरातील रस्त्यांवर काही मोजकेच छोटे खड्डे शिल्लक आहेत.
पण, प्रत्यक्षात आजही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे दिसतात. सिंहगड रस्त्यासह पुण्यातील विविध भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या या निराधार दाव्यावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
खड्डे बुजविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना 10 लाखांचा निधी
शहरातील 12 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांचे बांधकाम, देखभाल आणि दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या रस्ते विभागाच्या मुख्य विभागाकडून केले जाते. तर बारा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभालीचे काम प्रादेशिक कार्यालयामार्फत केले जाते.
दरम्यान, पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने 15 क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्ते विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले की, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये, जिथे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे, तिथे दुरुस्तीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. याद्वारे तेथील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात आहेत. प्रशासनाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. तिथून आलेल्या तक्रारींनुसार काम केले जात आहे.