Chilhewadi Dam Pudhari
पुणे

Chilhewadi Dam Water Level: चिल्हेवाडी धरणात 6 हजार क्यूसेक्स पाण्याची आवक; मांडवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

माळशेज पट्ट्यात मुसळधार पाऊस कायम; धरण 76 टक्के भरले, विसर्ग वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: माळशेज पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, धरणात सध्या सुमारे ६ हजार क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून मांडवी नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना उच्च असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुकडी जलसंपदा विभाग क्र. १, नारायणगाव यांनी बुधवारी (दि. ८) पहाटे साडेपाच वाजता जारी केलेल्या सूचनेनुसार, चिल्हेवाडी धरण ७६ टक्के भरले असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा आवक आणखी वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन चिल्हेवाडी, आंबेगव्हाण, पाचघर, रोहोकडी,ओतूर तसेच मांडवी नदीकाठच्या इतर गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणत्याही कारणासाठी जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.तसेच नदीपात्रात अथवा लगतच्या परिसरात असलेली जनावरे, शेतीपंप, वाहने, कृषी अवजारे आणि इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना संभाव्य वाढत्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या अणे माळशेज पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कुकडी जलसंपदा विभाग क्र. १, नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT