टाकळी भीमा येथे दिवाळीनिमित्त छोट्या किल्ल्याची बांधणी करीत इतिहासात रमलेले लहान मावळे. Pudhari
पुणे

Diwali fort making: मातीच्या गंधातून जागा इतिहास; चिमुकले उभारताहेत शिवकालीन गड-किल्ले

टाकळी भीमा परिसरात दिवाळी सुट्यांमध्ये लहान मावळ्यांची लगबग; गडबांधणीच्या परंपरेतून संस्कृती आणि सर्जनशीलतेचा संगम

पुढारी वृत्तसेवा

टाकळी भीमा : दिवाळीच्या सुट्या सुरू होताच टाकळी भीमा परिसरात लहान मावळ्यांची लगबग सुरू झाली आहे. हातात कुदळ, फावडी, खोरे आणि डबे घेऊन ही बालसेना मातीशी पुन्हा नाते जोडत आहे. मोबाईल आणि व्हिडीओ गेमच्या दुनियेत रमलेल्या पिढीला दिवाळीने पुन्हा मातीचा स्पर्श दिला आहे. कारण, दिवाळी आली की या चिमुकल्यांना आठवतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी गड-किल्ला!(Latest Pune News)

गावागावांत मुले दगड, विटा, माती, गवत, रंग आणि भगवे झेंडे गोळा करून गड-किल्ले उभारण्यात मग्न आहेत. कुठे रायगड, कुठे प्रतापगड, कुठे सिंहगड, तर कुठे शिवनेरी... अशी बालहातांनी उभी केलेली मराठी संस्कृतीची प्रतीके घराघरांत झळकत आहेत. ही गडबड म्हणजे बालपणाच्या गोड आठवणींचा भाग आणि मराठी वारशाचा सजीव सण ठरत आहे.

अनेक ठिकाणी आजी-आजोबा नातवंडांना गडबांधणीची कला शिकवतात, तर पालक या कामात मुलांना प्रोत्साहित करीत आहेत. ही केवळ मातीची रचना नसून इतिहास आणि संस्कृती शिकवणारा जिवंत धडा ठरतो आहे. या उपक्रमातून मुलांमध्ये इतिहास, भूगोल आणि बांधकामशास्त्राचे ज्ञान रुजत असून, कल्पकतेला वाव मिळत आहे.

तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, धानोरे, डिग््राजवाडी आदी गावांमध्ये घराघरांत रायगड, प्रतापगडाची प्रतिकृती उभी राहिली आहे. काही ठिकाणी बालकांनी लाइटच्या छोट्या दिव्यांनी आणि रंगबिरंगी सजावटींनी आपल्या गडांना आकर्षक रूप दिले आहे. दिवाळीतील हा उपक्रम संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा ठरतो आहे.

अनेक गावांमध्ये दिवाळी गड-किल्ला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले असून, बालकांनी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून आपल्या कल्पकतेची झलक दाखवली आहे. या उपक्रमातून नव्या पिढीची ऐतिहासिक जाणीव, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन प्रभावीपणे दिसून येतो. दिवाळीतील ही गड-किल्ला परंपरा म्हणजे निसर्गाशी आणि संस्कृतीशी जुळलेला सणाचा खरा उत्सव ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT