पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर बारकाईने लक्ष आहे. ते दर दोन आठवड्यांनी पुण्यात असतात. शहराचा सर्वोत्तम विकास हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांनी 2029, 2035 आणि 2047 चे पुणे असे व्हिजन ठरविले आहे.
पुढील काही काळात पुण्याच्या पायाभूत सुविधा राज्यात सर्वांत उत्तम असतील. कोणीही कल्पना केली नसेल, असे पुणे शहर भविष्यात पाहायला मिळेल, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (Latest Pune News)
‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’चे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहमंत्री रमेश बागवे, अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील, आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी इंद्रजित बागल, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल, जयश्री बागूल आदी उपस्थित होते.
या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना ‘महर्षी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सामाजिक कार्यकर्त्या मेघा सामंत, बुलडाणा अर्बन बँकेचे प्रमुख शिरीष देशपांडे, लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना ‘लक्ष्मीमाता’ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी डॉ. मयूर कर्डिले, डॉ. अरविंद खोमणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
बावनकुळे साहेबांनी माझा मान राखला: बागूल
महोत्सवाचे व्यासपीठ पक्षविरहित आहे. आबांनी आमंत्रणपत्रिकेवर नाव तर छापले; पण बावनकुळे येणार नाहीत, अशी चर्चा झाली. अनेकांनी पैजा लावल्या. मात्र, साहेब माझे समाजबांधव आहेत. ते माझ्या विनंतीला मान देऊन ते आले.
ते सर्वसमावेशक असून, कोणालाही पक्षात घेऊ शकतात, इतका साहेबांचा शब्द महत्त्वाचा आहे. बावनकुळेसाहेब घरचा नवसाच्या देवीचा उत्सव सांभाळून आले. त्यांनी माझा मान राखला. मी आयुष्यभर त्यांच्या शब्दांत राहील, अशा भावनाही बागूल यांनी व्यक्त केल्या.
जगात कोणीच परिपूर्ण नसते. प्रत्येकाला परमेश्वराने काही गुण दिलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाने इतरांकडून शिकले पाहिजे. मनुष्याच्या जीवनात पद, प्रतिष्ठा, पैसा कायम पुरत नाही. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीसाठी केलेले कार्यच आपल्याबरोबर राहते. आपल्या देव, देश, धर्मासाठी काम केले, तर आपला देश खऱ्या अर्थाने विकसित होईल.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. माझ्याकडे वाहतुकीचा मायक्रो प्लॅन तयार आहे. बावनकुळे साहेबांनी त्यात लक्ष घातले, तर पुणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होऊ शकेल. त्याचबरोबर पुणे पालिकेने बजेट प्रत्यक्षात मोठे असले तरी विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही. पालिकेमध्ये ‘वन टाइम टॅक्स’चे धोरण लागू केल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील.- आबा बागूल, संयोजक, पुणे नवरात्रौ महोत्सव