

पुणे: राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी एमआयडीसीने ‘वॉक टू वर्क’ हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सध्याच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये बदल केला आहे.
त्यानुसार मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशातील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये भूखंडाच्या 60 टक्क्यांपर्यंतचे क्षेत्र औद्योगिक वापरासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे, तर उर्वरित 40 टक्के भूखंड इतर पूरक वापरासाठी वापरता येईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी घरासोबतच कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा उभारता येणार आहेत.
राज्यात माहिती तंत्रज्ञान पार्क, जैवतंत्रज्ञान पार्क, डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स पार्क आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर्स यांसारखे सेवा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या उद्योगांमुळे शहरांमध्ये आणि निमशहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे.
या वाढत्या मनुष्यबळासाठी निवास आणि इतर पूरक सुविधा पुरविणे आवश्यक झाले आहे. ‘वॉक टू वर्क’ या संकल्पनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या जवळच राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रांमध्ये साहाय्यभूत सेवांसाठी सध्या प्रस्तावित असलेल्या क्षेत्राचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला. यावर एमआयडीसीने नागरिकांकडून हरकती मागविल्या आहेत. पूरक कामांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असेल, हे ठरविण्याचा अधिकार प्राधिकरणाकडे असेल.
तसेच, औद्योगिक आणि पूरक कामांच्या जागेनुसार, आवश्यक असलेली मोकळी जागा आणि इतर सुविधांसाठीची जागांचे वाटपही त्याच प्रमाणात केले जाईल. या बदलांमुळे औद्योगिक क्षेत्रे केवळ कामाची ठिकाणे न राहता, सर्व सुविधांनी युक्त अशी ‘स्मार्ट’ वसाहत होणार आहेत. ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लागेल. तसेच, औद्योगिक भूखंडांचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने होईल, अशी अपेक्षा आहे.
वॉक टू वर्क म्हणजे काय?
वॉक टू वर्क म्हणजे नोकरीच्या ठिकाणी चालत जाणे. याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळच राहण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे; जेणेकरून त्यांना कामावर जाण्यासाठी गाडी किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागणार नाही. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. ही संकल्पना आता अनेक ठिकाणी विशेषतः मोठ्या कंपन्या आणि आयटी पार्कमध्ये लोकप्रिय होत आहे, जिथे कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणाजवळ निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते.
... हे होणार फायदे
‘वॉक टू वर्क’मुळे कर्मचाऱ्यांचा प्रवासातील वेळ आणि श्रम वाचेल. औद्योगिक वसाहतींमध्ये निवास आणि पूरक सुविधा उपलब्ध झाल्यास अधिक मनुष्यबळ आकर्षित होईल, ज्यामुळे संबंधित भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. शहरी पायाभूत सुविधांवरील भार कमी होईल.