पुणे: महापालिकेच्या निवडणुका राज्यात सत्ताधारी असलेले तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत. आमची महायुती आहे. मात्र, काही अपवादात्मक ठिकाणी आम्ही समजूतदारीने वेगळे लढू.
वेगळं लढावं लागलं तरी आम्ही एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने प्रचार करू. तसेच जेवढ्या जास्त जागांवर एकत्र लढता येईल तेवढ्या जास्त जागांवर एकत्र लढण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि स्वतंत्र लढलो, तरी निवडणुकीनंतर एकत्र येऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
राज्यातील महापालिकांचे आयुक्त तसेच अ वर्ग नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांची परिषद यशदा येथे झाली. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. (Latest Pune News)
मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.
त्यांनीही सहा ते सात वर्षे तयारी केलेली असते, त्यांना दुखवून चालत नाही. अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढू, जे निवडून येतील विजयानंतर ते पुन्हा एकत्रच येतील. याबाबत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एकमेकांवर टीका करणार नाही...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. तेथे त्यांचे काम असते. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल. मात्र हे करताना एकमेकांवर कोणतीही टीका केली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ज्या पक्षाचा उमेदवार तुल्यबळ असेल त्याचा विजय निश्चित आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकत्र येऊ, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.