मंचर: विवाह समारंभ, यात्रा इत्यादीमुळे ग्रामीण भागात चिकनला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकनचे भाव कडाडले आहेत. सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने थंडी काही प्रमाणात वाढल्याने चिकन खाणार्यांची संख्या वाढल्याचे चित्र मंचर परिसरात दिसून येते.
सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारामध्ये बॉयलर कोंबड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात पाण्याअभावी बहुतांश पोल्ट्री फार्म बंद असतात. त्यामुळे उत्पादन कमी निघते. मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत झाल्याने सध्या बॉयलर कोंबड्यांच्या लिफ्टिंग होलसेल दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन बॉयलर कोंबडीचे लिफ्टिंग 1 किलो दरासाठी 110 रुपयांच्या पुढे गेले आहे. (Latest Pune News)
15 दिवसांपूर्वी 180 ते 190 रुपये किलो दराने मिळणारे बॉयलर कोंबडीचे चिकन सध्या 200 ते 220 रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्रेते विकत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे विक्रेते इसाक शेख, घोडेगाव येथील बॉयलर कोंबडीचे व्यापारी व चिकन विक्रेते जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी दिली.
अंडी उत्पादन करणारे बहुतांश पोल्ट्री फार्म ग्रामीण भागात बंद पडले असून, अंड्यांच्या घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अंड्यांच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अंड्यांचे बाजारभाव शेकडा 600 रुपयांच्या पुढे गेला आहे. अंडी एक नग 7 रुपयांप्रमाणे 84 रुपये डझनने विकली जात असल्याची माहिती अंडी उत्पादक शेतकरी गोविंद थोरात, निकेतन दैने, माया शंकर थोरात यांनी दिली.
बकर्याच्या मटणाला बाजारात मोठी मागणी
बकर्याच्या मटणाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या मटणाचा एक किलोचा दर 720 रुपये ते 750 रुपये असल्याची माहिती बकर्याचे व्यापारी व एकलहरे चॉईस मटनचे विक्रेते शेखर कांबळे यांनी दिली. पुढे येणार्या आखाड महिन्यात चिकन,
अंडी आणि मटणाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची दाट शक्यता आहे. आषाढ महिन्यात गावठी कोंबडी आणि गावठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. त्यादृष्टीने ग्रामीण भागात गावठी कोंबडी पालन व्यवसाय सुरू झाला आहे. त्याचा फायदा कोंबडी उत्पादक शेतकर्यांना होत असल्याचे अवसरी खुर्द येथील पोल्ट्री व्यावसायिक विजय शिंदे यांनी सांगितले.