Chhatrapati workers latest salary news
भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा पगार दहा टक्के वाढला आहे. या वेतनवाढीच्या प्रस्तावास संचालक मंडळाच्या सभेमध्ये तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्रिपक्षीय समितीच्या कराराची अंमलबजावणी करणारा श्री छत्रपती कारखाना हा राज्यात पहिला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार 23 जुलैला बैठक झाली होती. त्यात 1 एप्रिल 2024 पासून सर्व अधिकारी व कामगार यांचा मूळ पगार, महागाई भत्ता व स्थिर भत्ता मिळवून मिळणार्या एकूण पगारावर दहा टक्के पगार वाढ व सोयीसुविधा देण्याचे मान्य केले, त्यानुसार करार करण्यात आला आहे. (Latest Pune News)
उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना वाटचाल करीत आहे. आता त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना सर्वप्रथम वेतनवाढ लागू करणारा हा कारखाना राज्यात पहिला ठरला आहे.
सभासदांसह कामगारांचे हित जोपासण्यास संचालक मंडळाचा प्रयत्न असतो, असे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगतिले. या वेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, तांत्रिक सल्लागार महादेव निकम, कामगार नेते युवराज रणवरे, सतीश गावडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक आदी उपस्थित होते.
संचालक मंडळाचे आभार
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्यास तत्त्वतः मान्यता दिल्याबद्दल कामगार नेते युवराज रणवरे यांनी कारखान्याचे संचालक मंडळ व पदाधिकार्यांना पेढे वाटून आभार व्यक्त केले.