भवानीनगर: त्रिपक्षीय समितीच्या कराराची अंमलबजावणी करून कामगारांच्या बँक खात्यावर ऑगस्ट महिन्याचा पगार गुरुवारी (दि. 4) 10 टक्के वाढीसह जमा करणारा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना राज्यात पहिला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिली.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, सतीश गावडे आदींसह कामगार उपस्थित होते. (Latest Pune News)
गुरुवारी श्री छत्रपती कारखान्याच्या कामगारांच्या बँक खात्यामध्ये 10 टक्के वाढीसह पगार जमा झाल्यानंतर कामगारांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली व एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना पेढे भरवून कामगारांनी आनंद व्यक्त केला. याबाबत जाचक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे कामगारांना 10 टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार कारखान्याच्या 12 ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी दहा टक्के पगार वाढ करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. राज्यातील इतर साखर कारखान्यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतला नसताना छत्रपती कारखान्याने मात्र वाढीसह पगार जमा केल्यामुळे श्री छत्रपती कारखान्याच्या गाळप हंगामामध्ये कामगार कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन कामगार नेते युवराज रणवरे यांनी दिले.
या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये कामगारांनी 12 लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप करण्यासाठी सहकार्य करावे एवढीच कामगारांकडून अपेक्षा आहे.- पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना.