पुणे

पुणे : बहुजनांचा ब्रँड होईन : छत्रपती संभाजीराजे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : '350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक गोसावी समाजाच्या निश्चयपुरी गोसावी यांच्याकडून करून घेत छत्रपतींनी नवा आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श 'स्वराज्य'च्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजे पुढे नेत आहेत. गोसावी समाजाच्या प्रश्नांसाठी मी समाजाचा ब्रँड म्हणून नेतृत्व करण्यास तयार आहे. माझ्याकडे ही जबाबदारी दिली तर मी ती पूर्ण करेन. समाजातील नेत्यांनी माझ्यापर्यंत येण्यासाठी एवढा विलंब का लावला? याचीच काळजी वाटते,' असा सवाल करत छत्रपती संभाजी राजे यांनी भूमिका स्पष्ट केली.

अखिल भारतीय गोसावी समाजाचा मेळावा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, करण गायकवाड, धनंजय जाधव, किशोर गोस्वामी व देशभरातून आलेल्या संत, महंतांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी राजे पुढे म्हणाले, 'साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेला राज्याभिषेक आठवला, तर दूरदृष्टी लक्षात येते.

पंडित, वेद जाणणारा किंवा ज्ञानीकडे राज्याभिषेकाचे काम न सोपवता बहुजनांमधील म्हणजेच गोसावी समाजातील निश्चयपुरी गोसावी यांच्याकडे सोपवले. तसे पाहिले तर हा समाज मोठा भाग्यवान समाज आहे; कारण छत्रपतींनी या समाजातील जाणत्या व्यक्तीकडून शिवराज्याभिषेक करून घेत नवा आदर्श निर्माण केला. छत्रपतींनी असं त्या वेळी का केलं हीदेखील संशोधनाची बाब आहे.' 'माझ्यावर झालेले संस्कार बघता मी तब्येतीपेक्षा शब्दाला मान देत कार्यक्रमाला हजर राहिलो. मी दिलेला शब्द पाळणारा असून, तुम्हीदेखील शिवछत्रपतींपासून एकनिष्ठ राहणारे समाजबांधव आहात. म्हणून समाजाचा कुठलाही कार्यक्रम असो तो अत्यंत शिस्तीत होतो आणि झालेलाही आहे. सभागृहातील प्रत्येकाच्या गळ्यात असलेला गमच्या हेच मोठे शिस्तीचे प्रतीक आहे, असे मी मानतो.'

समाज अन् छत्रपतींचं नातं….

'समाजातील व्यक्तींचं आणि छत्रपतींचे नातं काय होते हे आज कोणीही विसरू शकत नाही. जेव्हा-जेव्हा मराठ्यांचा इतिहास लिहिला जातो, त्या-त्या वेळी गोसावी समाजाला बाजूला ठेवून तो लिहिताच येऊ शकत नाही, हे छत्रपतींनी आजही बहुजनाप्रती असलेल्या प्रेमाने दाखवून दिले.'

महाराष्ट्रात गडबड..

'मी राजकारणावर काही बोलणार नाही. मात्र राज्यात स्वराज्य पक्षाची सुरू असलेली घोडदौड पाहता सर्वांचे धाबे दणाणले आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात गडबड आहे. म्हणूनच आताचा मावळा हा चालू कालखंडानुसार एका विशिष्ट ध्येयाने पुढे दौडत आहे. या घोडदौडीत 'स्वराज्य'देखील मराठ्यांसह बहुजनांचे नेतृत्व करण्यास पुढे आलेला आहे.'

बहुजनांसाठी राजर्षी शाहूंचा मोठा निर्णय…

'दोनशे वर्षांनंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांसाठी मोठा निर्णय घेतला. समाजातील प्रत्येक घटकासाठी आरक्षणाची गरज कशी आहे, याची व्याख्या मांडत ती अमलात आणण्यासाठी अनेकांचा विरोध पत्करला. मी केवळ मराठ्यांचा नाही त्यापेक्षा बहुजनांचा व त्यांच्या विषयाला समजून घेऊन त्यांची बाजू मांडणारा छत्रपती आहे, असे मी मानतो,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहंकार माझ्यात नाही….

'राजकारणापेक्षा समाजकारण आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. संस्कारामुळे माझ्यात 'राज अहंकार' कधीच येत नाही. अहंकार नसल्याने तुम्ही माझ्याकडे कधीही, केव्हाही येऊ शकता. मात्र, माझ्यापर्यंत येण्यासाठी गोसावी समाजातील नेत्यांना 50 वर्षे लागली, याची काळजी वाटते.'

हेही वाचा

SCROLL FOR NEXT