प्रसाद जगताप
पुणे : प्रवेशद्वाराला गेट नाही… इमारतीचा रंग उडालेला… परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा… इतरत्र पडलेल्या दारूच्या बाटल्या… कार्यालयातील भिंतीवरील चित्रकला… स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून कार्यालयाचे आणि चौकशी ऑफिसचे गायब झालेले दरवाजे आणि खिडक्या, अशी अतिशय दयनीय अवस्था सातारा महामार्गावरील चेलाडी एसटी स्थानकाची झाली आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या बहुतांश गाड्या एसटी संपामुळे बंद आहेत. परिणामी, ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी प्रवाशांना गाड्याच मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तिथेही प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. त्यातच एसटीच्या गाड्याच येत नसल्यामुळे चेलाडी येथे असलेल्या एसटीच्या स्थानकाची अवस्था एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे झाली आहे. येथील लोखंडी वस्तूंना गंज चढला आहे. दारे, खिडक्या गायब असून, प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाकदेखील तुटलेले आहेत, पत्रेही सडलेले आहेत. येथे साधा सुरक्षारक्षकसुध्दा नाही. त्यामुळे येथे एसटी प्रशासनाने लक्ष घालून चेलाडी एसटी स्थानक सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
या महामार्गावर असलेल्या या एसटी स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथे असलेल्या कार्यालयाच्या, चौकशी ऑफिसच्या भिंतींवर काढलेल्या विकृत चित्रांनी येथील भिंती विद्रुप झाल्या आहेत.
चेलाडी एसटी स्थानक परिसर आणि चौकशी ऑफिस परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. याठिकाणी एसटीचा एकही कर्मचारी नसल्यामुळे ही अवस्था झाली आहे. या स्थानकाला प्रवेशद्वारावर दरवाजा नसल्याने हे स्थानक 'आओ जाओ घर तुम्हारा' बनले आहे.
कोरोनाकाळापासून हे स्थानक बंद आहे. त्यात एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे येथे कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे स्थानकाची दुरवस्था झाली आहे. लवकरच त्याची दुरूस्ती करून पुन्हा सुरू करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक व्यवस्थापक, पुणे विभागवेल्हे तालुक्यातील नागरिकांसाठी हे एक मध्यवर्ती स्थानक आहे. मात्र, हे स्थानक बर्याच दिवसांपासून बंद असल्यामुळे खूपच घाण झाले आहे. अनेक ठिकाणी तूटफूट झाली आहे. त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी आणि पुन्हा सुरू करावे.
– राजू रेणुसे, स्थानिक नागरिक, वेल्हे तालुका