‘श्री छत्रपती’च्या ड्रॉ धोरणामुळे सभासदांमध्ये समाधान; ऊस लागण नोंदीसाठी राबविला अभिनव उपक्रम Pudhari
पुणे

Shri Chhatrapati Sugar Factory: ‘श्री छत्रपती’च्या ड्रॉ धोरणामुळे सभासदांमध्ये समाधान

ऊस लागण नोंदीसाठी राबविला अभिनव उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली उसाच्या लागणीची नोंद ड्रॉ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दि. 1 जुलै रोजी कारखान्याने फुले 265 या उसाच्या लागणीला परवानगी दिली आहे व त्याच दिवशी ड्रॉ पद्धतीने ऊस उत्पादक सभासदांनी लागण केलेल्या उसाची त्वरित नोंद संबंधित गावांच्या सोसायटी तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली. (Latest Pune News)

ज्या शेतकर्‍यांनी एक जुलैला उसाच्या लागणीची नोंद दिली आहे, त्या शेतकर्‍याच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समध्ये टाकण्यात आली व ड्रॉ पद्धतीने बॉक्समधून शेतकर्‍यांच्या नावाच्या चिठ्ठ्याबाहेर काढून त्यांची नोंद घेण्यात आली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना रांगेत उभा राहण्याची वेळ आली नाही.

पूर्वी उसाच्या लागणीच्या नोंदी लावण्यासाठी शेतकर्‍यांना आपला क्रमांक लवकर येण्यासाठी रात्री तसेच पहाटे रांगेत येऊन थांबावे लागत होते. यामध्ये एखाद्याने मध्येच नाव घुसवल्यानंतर गोंधळ निर्माण होत होता. त्याचा प्रचंड त्रास सभासदांना (शेतकर्‍यांना) होत होता. ड्रॉ पद्धतीमुळे सभासदांना रांगेत उभा राहण्याचा त्रास यावर्षी झाला नाही.

एक जुलै रोजी फुले 265 या ऊस जातीच्या नोंद दिलेल्या ऊस क्षेत्राची लागवड 3 जुलैपर्यंत कारखान्याने दिलेल्या मुदतीत सभासदांनी पूर्ण करणे बंधनकारक होते. त्यामुळे ऊस लागण नोंदीमध्ये पारदर्शकता येऊन उसाच्या लागणीच्या बोगस नोंदी रोखण्यास मदत झाली. सपकळवाडी येथे सोसायटीच्या कार्यालयासमोर ड्रॉ पद्धतीने ऊस लागण नोंद घेण्यात आली. यावेळी कारखान्याच्या संचालिका सुचिता सपकळ, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, तुषार सपकळ व शेतकरी उपस्थित होते.

श्री छत्रपती कारखान्याने कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागण नोंदीचे ड्रॉ पद्धतीचे नवीन धोरण अवलंबल्यामुळे सभासदांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- रामचंद्र निंबाळकर, संचालक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना
श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाने नवीन राबववलेले ऊस लागण नोंदीचे धोरण सभासदांना चांगले वाटत आहे. हे ड्रॉ पद्धतीचे धोरण सभासदांसाठी त्रासदायक नाही.
- तुषार सपकळ, ऊस उत्पादक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT