पुणे: बऱ्याचदा धर्मादाय रुग्णालयांच्या आवारात काही व्यक्ती एजंट असल्याचे भासवून रुग्णांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करतात. बिलाची रक्कम कमी करण्यासाठी, उपचार योजनेमध्ये बसवण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयामार्फत मदत करण्याचे आश्वासन देतात आणि पैसे घेऊन पसार होतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एजंटच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. (Latest Pune News)
काही एजंट किंवा दलाल रुग्णालयाशी संबंधित असल्याचे भासवून रुग्णांकडून आर्थिक व्यवहार करत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने इशारा जारी केला आहे. या कार्यालयाचा व रुग्णालयासंबंधीच्या एजंटचा कुठलाही संबंध नाही. सर्व रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी. तिसऱ्या इसमाच्या भूलथापांना बळी पडून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना फलक कार्यालयात लावण्यात आला आहे.
अलीकडे काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही व्यक्ती रुग्णालयातील उपचार, सल्ला मसलत किंवा दाखल प्रक्रिया वेगात पूर्ण करून देण्याचे आमिष दाखवत पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने कार्यालयाने सर्वसामान्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
रुग्णालय प्रशासनाने या प्रकारांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याचे ठरवले असून, परिसरात सूचना फलक लावले जाणार आहेत. रुग्ण आणि नातेवाइकांनी अधिकृत शुल्काशिवाय कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. या कारवाईमुळे रुग्णालय परिसरातील बेकायदेशीर एजंटांची मुस्कटदाबी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनो, बाहेरील व्यक्तींचा सहभाग नसतो
कोणत्याही रुग्णालयाशी संबंधित अधिकृत प्रक्रिया थेट रुग्णालयाच्या प्रशासनामार्फतच पार पडतात. यामध्ये कोणत्याही एजंटचा किंवा बाहेरील व्यक्तीचा सहभाग नसतो. त्यामुळे अशा लोकांच्या आमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित संबंधित प्रशासन अथवा पोलिसांकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.