बारामती: होळ (ता. बारामती) येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त बुधवारी (दि. 7) रात्री तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना जोरदार धिंगाणा झाला. या सगळ्या प्रकारामुळे लोकनाट्य तमाशाचा सुरू असलेला कार्यक्रम बंद करावा लागला. याप्रकरणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यात्रा समितीमधील काही सदस्यच थेट रंगमंचावर गेल्याने त्यातून वाद उफाळला.
होळच्या ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा मंगळवार (दि. 6) पासून सुरू झाली. सायंकाळी श्रींचा विवाह सोहळा आणि मिरवणूक, छबिना शांततेत पार पडला. बुधवारी दिवसभर तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला.
रात्री मंगला बनसोडेसह नितीन बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम शांततेत सुरू होता. उपस्थित नागरिक शांततेत त्याचा आस्वाद घेत होते. (Latest Pune News)
दरम्यान, कार्यक्रमात पुढे ’मला अटक करा हो पुण्यात...’ या गाण्यावेळी कलाकाराने थेट प्रेक्षकांमधून एन्ट्री घेत ते रंगमंचावर गेले. पाठोपाठ यात्रा कमिटीमधील एक मद्यधुंद सदस्य आणि गावचा माजी सरपंच रंगमंचावर गेला. काहींनी त्याला खाली येण्यास सांगितले. त्यातून वादाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या या वादामुळे मोठ्या संख्येने बसलेले प्रेक्षक उठले. वादामुळे कलाकार रंगमंच सोडून पाठीमागे गेले.
हा वाद बराच काळ सुरू होता. त्यातून एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सगळ्या घडामोडीत करमणुकीसाठी असलेला लोकनाट्याचा कार्यक्रम बंद करण्याची वेळ आली. जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनीही हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच, यात्रा कमिटीतील सदस्यांनी जबाबदारीने काम करण्याऐवजी मद्यपान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त
गावची यात्रा वर्षातून एकदा होत असते. ग्रामीण भागात लोकनाट्याचे मोठे आकर्षण असते. यात्रोत्सवासाठी ग्रामस्थ वर्गणी जमा करत असतात. यात्रेचा आनंद लुटता यावा, कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, ही भावना त्यामागे असते.
परंतु, अशा प्रकारांमुळे यात्रेला गालबोट लागते. होळ येथेही मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांचा यामुळे चांगलाच हिरमोड झाला. ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली. जबाबदार पदाधिकारी दारू पिवून भर कार्यक्रमात गोंधळ घालत असतील, तर वर्गणी कशासाठी द्यायची, त्यांच्या कलेचा आनंद घेण्याऐवजी धिंगाणा घालून कार्यक्रम बंद करण्यात कसला आनंद, असा सवाल ग्रामस्थांनी केला.