पुणे: गणेशोत्सवाचे आयोजन व रूपरेषा ठरवण्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत सोमवारी (दि. 21) प्रचंड गोंधळ झाला. परवानगी नसताना या बैठकीत पर्यावरणवाद्यांनी त्यांची मते मांडल्याने गणेश मंडळांचे कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यांना बोलण्यास मनाई करूनही काही
पर्यावरणवाद्यांनी बोलणे चालूच ठेवल्याने मंडळांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यात एक पर्यावरणवादी हिंदीतून बोलू लागल्याने त्याला मराठीत बोलण्यास सांगूनही त्याने हिंदीतून बोलणे सुरूच ठेवल्याने कार्यकर्ते त्याच्यावर धावून गेले. यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर काढल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. (Latest Pune News)
गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे आयोजन, नियोजन व त्याची रूपरेषा ठरविण्याकरिता व उत्सव शांततेने, शिस्तीने व उत्साहात पार पाडण्याच्या द़ृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, मनपा अधिकारी व पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केली होती.
या बैठकीला आयुक्त नवलकिशोर राम, झोन 1 चे डीसीपी ऋषीकेश रावळे, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे व पुण्यातील विविधी गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महानगर पालिकेच्या प्रशासनाला अनेक सूचना केल्या. वाहतूक नियोजन, स्वच्छता, पोलिस मदत कक्ष, मेट्रो आदी विषयांवर प्रश्न अधिकार्यांना विचारण्यात आले. या बैठकीला काही पर्यावरणवादीदेखील उपस्थित होते.
त्यांनीदेखील या बैठकीत ध्वनिप्रदूषण, शाडूच्या गणेशमूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा वापर टाळावा याबाबत सूचना करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ही बैठक केवळ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केल्याचे सांगून आम्हाला बोलण्यास संधी द्या, असे म्हणत त्यांनी त्यांना बोलण्यास विरोध केला. पर्यावरणवाद्यांनी माइक हातात घेऊन बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.
गणेश मंडळांवर विचार लादण्याचा प्रयत्न
झालेल्या गोंधळानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बोलण्यास सुरुवात केली. घाटे म्हणाले, मुळात ही बैठक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी असून त्यांना सभागृहात येण्याची परवानगी कशी मिळाली? हे लोक कुठून तरी येतात आणि या ठिकाणी आपले मत मांडून त्यांचे विचार गणेश मंडळांवर लादतात.
हे कुठे तरी थांबले पाहिजे. प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते हातात हात घेऊन काम करत आहेत. ढोल ताशा पथकांनादेखील सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील घाटे यांनी या वेळी केली.
ही बैठक केवळ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केली होती. या बैठकीत इतर नागरिकदेखील सहभागी झाले. देशाचे नागरिक म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, यापुढे केवळ मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी ही बैठक घेतली जाईल तसेच तशी व्यवस्थादेखील करण्यात येईल.- नवलकिशोर राम, आयुक्त, महानगरपालिका