पुणे : सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह करणार्या मागासवर्गीय दाम्पत्यांसाठी कन्यादान योजनेत बदल करण्यात आला आहे. राज्यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणार्या जोडप्यांना कन्यादान योजनेंतर्गत दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना राज्य शासनाने सन 2003-04 पासून लागू करण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 जोडप्यास या योजनेचा लाभ देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार विवाह करणार्या दाम्पत्यास मंगळसुत्रासाठी सहा हजार, संसारपयोगी साहित्यासाठी चार हजार असे एकूण दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते. त्यानंतर सन 2016 मध्ये या योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यांमध्ये भाग घेऊन विवाह करणार्या मागासवर्गीय दाम्पत्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना अनुक्रमे 20 हजार रुपये आणि चार हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही अनुदानाची रक्कम दहा वर्षांपूर्वी निश्चित केली आहे. मात्र, महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजनेच्या धर्तीवर योजनेमध्ये एकसुत्रीपणा असण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यांमध्ये भाग घेऊन विवाह करणार्या मागासवर्गीय दाम्पत्यांना प्रतिजोडपे 20 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये वाढीव अनुदान मंजुर करण्यास, तसेच कन्यादान योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थांना चार हजार रुपयांची अनुदान कायम ठेवण्यात आले आहे, असे समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.