BJP internal politics news Maharashtra
पुणे: भाजपच्या संघटनपातळीपासून प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या बदलांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने आता शहराध्यक्षांची निवडही नव्याने होणार आहे. मात्र, पुणे शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीने महापालिका निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने संघटनेत फेरबदल सुरू केले आहेत. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे आता सर्वच शहरांमधील अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांसह संघटनेतील विविध समित्या व त्यांच्या अध्यक्ष बदलांच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
पुण्यातही मे खेरपर्यंत नवीन शहराध्यक्षांची निवड जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या कार्यकारिणीला अवघा दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यामुळे या कार्यकारिणीला मुदतवाढ हवी आहे. यासंदर्भात घाटे यांनी कार्यकारिणीतील पदाधिकार्यांसह नुकतीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आमच्या कार्यकारिणीच्या कालावधीत झाल्या. त्यात पक्षाला पुण्यात चांगले यश मिळाले. आमच्या कार्यकारिणीला केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे पालिका निवडणुका होईपर्यंत शहराध्यक्षांसह हीच कार्यकारिणी कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली. त्यावर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.