शिवनगर: निवडणुका जाहीर झाल्यानंतर सध्या प्रचार सुरू आहे, अजून निवडणूक व्हायची आहे. असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री माळेगाव कारखान्याचे चेअरमन म्हणून जाहीर करतात. त्यांना केवळ सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील 11 गावे जोडण्यासाठी चेअरमन व्हायचे आहे, असा आरोप सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.
माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक प्रचार सभेत तावरे बोलत होते. या वेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. (Latest Pune News)
चंद्रराव तावरे म्हणाले की, माळेगाव कारखाना सहकारातील दिशा देणारा कारखाना आहे. या कारखान्याचा सभासद अत्यंत स्वाभिमानी आहे, त्यामुळे हा कारखाना राज्यात नावलौकिकास पात्र झाला आहे. असे असताना सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्यांची मागील अनेक वर्षांपासून सोमेश्वर कारखान्याशी नाळ जोडलेली आहे, त्या कार्यक्षेत्रातील 11 गावे जोडण्यासाठी आणि मतांचे राजकारण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घाट घालत आहेत, असा आरोप तावरे यांनी केला.
तावरे म्हणाले की, याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड मतांनी हा ठराव नामंजूर केला आहे. मात्र, सत्ताधारी संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने प्रोसिडिंग लिहून ठराव मंजूर असल्याचे सांगितले. त्या सभेला शासनाचा प्रतिनिधी उपस्थित होता, त्याने देखील ठराव मंजूर झाला नसल्याचा अहवाल दिला आहे.
त्यामुळे संबंधित 11 गावे जोडली गेली नाहीत. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले, तेथे देखील सत्ताधार्यांना न्यायालयाने फटकारले, असे तावरे यांनी सांगितले. आम्हाला माळेगाव कारखान्याचा छत्रपती साखर कारखाना होऊ द्यायचा नाही. छत्रपती कारखान्यात देखील अशाच पद्धतीने चुकीचे सभासद करून घेतले, त्यामुळे मछत्रपतीफचे वाटोळे झाले, असा आरोप देखील तावरे यांनी केला.
सत्ताधारी संचालक मंडळाने 60 लाख जास्तीचे देऊन साखर गोडाऊन बांधले. मात्र, पावसाळ्यामध्ये त्याचा पत्रा निघाला आणि साखर भिजली. त्या भिजलेल्या साखरेमुळे जवळपास 11 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांचे प्रतिटन 100 रुपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा सवाल करीत सत्ताधारी संचालक मंडळ अशाप्रकारे गलथान कारभार करीत असतील, तर त्यांना सभासदांच्या हिताचे तसेच कारखान्याचे काही घेणेदेणे नाही, असे मत तावरे यांनी व्यक्त केले.
तावरे म्हणाले, सत्ताधारी संचालक मंडळाने अनेक चुका केल्या आहेत. मात्र, त्यांचे नेते त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घालत आहेत. 7 लाख 20 हजार कोटींचा राज्याचा अर्थसंकल्प मांडत असल्याची टिमकी ते मिरवतात; मात्र एका सहकारी साखर कारखान्याचे अर्थकारण बिघडल्याचे त्यांना दिसत नसल्याचा आरोप तावरे यांनी केला.
तावरे म्हणाले की, मला तुम्ही मागील 45 वर्षे माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून संचालक, व्हाईस चेअरमन, चेअरमन आदी पदांवर काम करण्याची संधी दिली. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहीत आहे. मी कधीही कारखान्याचे नुकसान केलेले नाही, करणारही नाही.
मात्र, जर कोणी कारखान्याचे नुकसान करीत असेल, माझ्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या प्रपंचाशी खेळत असेल, तर मला ते गप्प बसून पाहता येणार नाही, माझा तो स्वभाव नाही आणि याचमुळे मी आपल्यासमोर पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तावरे यांनी नमूद केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेच्या निवडणुकीत उभे असताना मागील अनेकवेळा केवळ प्रचाराच्या सुरुवातीच्या नारळाच्या सभेला आणि शेवटच्या सभेला उपस्थित राहत होते. मात्र, माळेगाव कारखान्याच्या या निवडणुकीला त्यांनी जवळपास एका दिवसात तीन ते चार सभा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्यात दडलंय काय?- रंजन तावरे माजी अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना