Pune Political News: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या रॅलीत महायुतीचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
रॅलीतील रथामधून चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवीजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर, शिवसेनेचे नाना भानगिरे, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करत होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्वे पुतळ्यास अभिवादन करून मार्गस्थ झालेली ही रॅली कर्वे रस्ता, पौड फाटा, एसएनडीटी, नळस्टॉपमार्गे कोथरूडचे निवडणूक कार्यालय असलेल्या एरंडवणे येथील अनसूयाबाई खिलारे शाळेत पोहचली.
तसेच महिला, ज्येष्ठ नागरिकही या मिरवणुकीत भगवी टोपी, भाजपचे उपरणे घालून सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी झाल्याने कर्वे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.
तत्पूर्वी, चंद्रकांत पाटील यांनी सकाळी शंकर महाराज मठ, कसबा गणपतीचे दर्शन घेतले. मोतीबाग कार्यालयाला भेट दिली. तसेच छत्रपती संभाजी महाराज पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, कर्वे पुतळ्याला अभिवादन केले.
महायुतीचाच मुख्यमंत्री होणार - चंद्रकांत पाटील
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असून, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 24 नोव्हेंबरला महायुतीचाच मुख्यमंत्री शपथ घेईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कसबा गणपती येथे पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज्यात पुन्हा महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केली. दरम्यान, विजय संकल्प यात्रेमध्ये भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम, महायुतीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात येत होत्या. सर्वसामान्यांचा नेता पुन्हा होणार विजेता, असा मजकूर असलेले फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते.