पुणे: माहेराहून पैसे आणण्याच्या मागणीला कंटाळून दोन महिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चंदननगर आणि वाघोली येथे घडली असून, याप्रकरणी पतीसह इतर नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार आणि घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी कुटुंबीयांनी छळ केल्यामुळे महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 3 जूनला चंदननगरमधील तुकारामनगरात घडली. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पती गोरख संभाजी सोनवणे (वय 33, विशाललीला सोसायटी, तुकारामनगर) याला अटक केली आहे. तर सासू-सासरे संभाजी सोनवणे (वय 62) अलका सोनवणे (वय 55) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विनोद धुर्वे तपास करत आहेत.
सतत पैशांच्या मागणीला कंटाळून महिलेचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 1 जूनला वाघोलीत घडली. प्रियंका गणेश कांबळे (वय 25 रा. वाघोली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी तिचा पती गणेश दिगंबर कांबळे (वय 30 रा. वाघोली, मूळ- हडको, नांदेड) याला अटक केली आहे. अनिता वाघमारे (रा. कलवा, ठाणे) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे तपास करत आहे.